लग्नानंतर सुनेने सासरघरी पहिला पदार्थ गोडाधोडाचा करावा अशी एक प्रथा आहे. नवी सून कधी गोडाचा शिरा बनवते तर कधी शेवयांची खीर. पदार्थ कोणताही असो, सुनेच्या हाताने स्वयंपाकघरात गोडवा यावा आणि तिच्या हातच्या गोड पदार्थाने संसाराची सुरूवात व्हावी अशी यामागची भावना. भारतातील अनेक घरांमध्येही ही रीत अगदी उत्साहात साजरी केली जाते. पण नुकतीच लंडनमध्ये एका घरात आणि तीही सेलिब्रिटी अभिनेत्रीनेही सासरी गोड पदार्थ बनवून लक्ष वेधून घेतलं. ही अभिनेत्री आहे मराठी सिनेमाची अप्सरा सोनाली कुलकर्णी. नुकतीच ती दुसऱ्यांदा लग्नाचा हनिमून साजरा करून लंडनच्या सासरघरी पोहोचली आणि तिने तांदळाची खीर बनवून सर्वांचं तोंड गोड केलं.
तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच खीर न खाताच तिच्या चाहत्यांचं पोट भरलं आहे. आता सोनाली हनिमूनच्या हॉट मूडमधून बाहेर येत लंडनच्या सासरघरी रमली आहे. सोनालीने लंडनच्या घरी तांदळाची खीर बनवली आणि सासरच्या घरी सर्वांना खायला दिली. सोनालीचे खीर भरलेल्या वाट्यांचं ताट हातात धरत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनालीने कपाळावर कुंकू लावल्याने आणखीनच खुलून दिसत आहे. हनिमूनचा तिचा हॉट लुक जितका चर्चेत होता तितक्याच सोनालीच्या या मराठमोळ्या लुकला चाहत्यांची पसंती मिळत आहे. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटही दिल्या आहेत. तू खीर बनवलीस म्हणजे छानच असणार असं एका चाहत्याने म्हटलं आहे.
तर एका चाहत्याने लिहिलं आहे की खीर तुझ्यासारखीच गोड असणार, दुसऱ्या चाहत्याने लिहिलं आहे की या खिरीसारखाच तुमचा संसारही गोड होऊ दे. गेल्याच आठवड्यात सोनालीचा वाढदिवसही झाला. लग्नानंतर सासरी तिने पहिल्यादांच वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्या सासूबाईंनी तिचे औंक्षण केले. सासूबाई औंक्षण करत असतानाचा फोटोही तिने शेअर केला होता. सोनाली म्हणाली, गेल्यावर्षी मी लग्नं तर केलं पण लग्नाआधीचे आणि नंतरचे विधी मला साजरे करता आले नव्हते. तो आनंद मला या दुसऱ्यांदा लग्न केलं तेव्हा मिळाला. लग्नाचे विधी मला खूप आवडतात. त्यामुळे या दुसऱ्या लग्नात मी आणि कुणालने लग्नाच्या विधींचा आनंद घेतला. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर एक्टीव्ह तर असतेच आणि चर्चेतही असते.
सोनालीचं लग्न, तिचा हनिमून, तिचे हॉट फोटो यांनी गेल्या वर्षभरात सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षीच्या ७ मे रोजी दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पध्दतीने सोनालीने कुणालशी लग्नं केलं. त्यानंतर सोनाली कुणालसोबत मालदीवला हनिमूनला गेली. यंदाच्या ७ मे रोजी सोनालीने तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याबरोबरच पुन्हा एका कुणालशी विधीवत लग्नगाठ बांधली. लंडन येथे झालेल्या या विवाहसोहळ्याला दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक मित्रपरिवार हजर होता. लग्नानंतर ही नवी जोडी थेट पोहोचली मेक्सिकोच्या समुद्रकिनारी. सोनालीने तिची हनिमून डायरी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी खुली केली होती. बिकीनी आणि मोनोकिनी ड्रेसमधले तिचे फोटो खूपच व्हायरल झाले.