आशय कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग यांची प्रमुख भूमिका असलेला व्हिक्टोरिया हा मराठी हॉरर चित्रपट आज १६ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलेली आहे. ह्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात देखील स्पर्धकांना हॉरर टास्क देण्यात आलेले होते. राखी सावंतच्या अंगात देखील चंद्रमुखीचं भूत संचारलेलं पाहायला मिळालं हा सगळा खटाटोप व्हिक्टोरिया चित्रपटाच्या प्रमोशनासाठीच चालला होता हे आता उघड झालेले आहे.
व्हिक्टोरिया चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटातील थरार दृश्य पाहून प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता दाखवली होती. व्हिक्टोरिया चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः विराजस कुलकर्णी याने केले आहे. विराजसने दिग्दर्शन केलेला हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे. हॉरर चित्रपट प्रेक्षकांसमोर आणायची त्याची ही कल्पनाच खूप भन्नाट होती. मराठी सृष्टीत असे खूप कमी चित्रपट बनलेले आहेत, त्यामुळे पुष्कर जोगच्या साथीने त्याने चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. निर्माता म्हणून पुष्करने या चित्रपटाची जबाबदारी घेतलेली आहे. आज हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार होता, मात्र आता हा चित्रपट १३ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे.
आज विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेला गोविंदा नाम मेरा आणि हॉलिवूडचा बहुप्रतिक्षित अवतार २ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे व्हिक्टोरिया चित्रपटाला स्क्रिनिंग मिळणे थोडेसे कठीण झालेले आहे. याच कारणास्तव प्रेक्षकांना आपला चित्रपट सोयीस्कर रीतीने पाहायला मिळावा, म्हणून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. तसेही विकी कौशलच्या गोविंदा नाम मेरा या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे अवतार चित्रपटाच्या तुलनेत गोविंदा नाम मेरा चित्रपटाला प्रेक्षकांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. मात्र मराठी चित्रपटांना खूप कमी स्क्रीन्स मिळत असल्याने, हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे.