कलाकारांमध्ये कुठलंही सेलिब्रेशन असलं की त्या सोहळ्याला एक वेगळा ग्लॅमर चढलेला असतो. मात्र इथे लग्नाचा दहावा वाढदिवस म्हणून अतिशय साध्या पद्धतीने साजरा करून या सेलिब्रिटी कपलने आपला आनंद मित्र मंडळींसमवेत साजरा केलेला पाहायला मिळतो. हे सेलिब्रिटी कपल म्हणजेच अभिनेत्री स्नेहा माजगावकर शिरसाट आणि अभिनेता सुहास शिरसाट होय. सुहास आणि स्नेहा हे दोघेही कलाकार गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीशी जोडले गेलेले आहेत. स्नेहा सध्या झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेतून अश्विनीच्या मैत्रिणीची भूमिका साकारत आहे. तर सुहास शिरसाट याने चित्रपट, मालिकांमधून स्वतःची वेगळी ओळख जपली आहे.
सुहास मूळचा बीड जिल्ह्यातला तर स्नेहा ही साताऱ्याची आहे. दोघांनाही अभिनयाची आवड होती त्यामुळे दोघांनीही मुंबईत येऊन मालिका चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली. रात्रीस खेळ चाले या मालिकेतील दत्तूच्या भूमिकेसाठी सुहासने मालवणी भाषा शिकली होती. सुरुवातीला मालिकेच्या पहिल्याच पर्वात सुहासला मालवणी फारशी जमत नव्हती. त्यामुळे तो टीकेचा धनी बनला होता. मात्र कालांतराने सुहासने मालवणी भाषेवर उत्तम जम बसवला आणि रसिक प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मारून घेतली. सुहास आणि स्नेहा या दोघांची कॉमन फ्रेंड अनिता दाते हिच्यामुळे ओळख झाली होती आणि पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नुकतेच स्नेहा आणि सुहास या दोघांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाले आहेत.
हे सेलिब्रेशन करण्यासाठी मराठी इंडस्ट्रीतील त्यांच्या खास मित्र मैत्रिणींनी आउटडोअर टूरचे सरप्राईज प्लॅन आखले होते. यावेळी नंदिता पाटकर, पुष्कर सरद, आरती वाडगबाळकर या सेलिब्रिटींनी सुहास आणि स्नेहाचे पुन्हा एकदा लग्न लावून दिले. प्रेक्षकांना या सोहळ्यातला हा साधेपणा मात्र खूप भावला. कारण या साधेपणातच स्नेहा आणि सुहासचे सुख चेहऱ्यावर तरळलेले पाहायला मिळाले. या सोहळ्यातला दुहेरी आनंद म्हणजे ९ जूनला स्नेहा आणि सुहासच्या लग्नाचे सेलिब्रेशन तर झालेच. पण १० जूनला सुहासचा वाढदिवस असल्याने त्याचेही सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात, आनंदात पार पडले. या दोन दिवसात त्यांनी जी धमाल मजामस्ती अनुभवली त्याचे काही खास क्षण स्नेहा आणि सुहासने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानिमित्ताने १० वर्षांनी दोघांवर पुन्हा एकदा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.