गेल्या काही वर्षांपासून मराठी कलाकार आता व्यवसायाची वाट धरत आहेत. महत्वाचं म्हणजे या व्यवसायात त्यांना मोठे यश देखील मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने तिच्या वी नारी या साड्यांच्या ब्रँडचा शुभारंभ केला. त्यासोबतच रंग माझा वेगळा मालिकेतील अभिनेत्री अनघा अतुल हिनेही पुण्यात वदनी कवळ या नावाने हॉटेल सुरू केले. तर या क्षेत्रात अगोदरच पाऊल टाकलेल्या सिया पाटील हिने तिच्या तिसऱ्या हॉटेलच्या उद्घाटनाची तयारी केली आहे. सिया पाटील आता अभिनेत्री कमी आणि उद्योजिका म्हणून जास्त परिचयाची बनत आहे.
कारण सिया केवळ हॉटेल व्यवसायात नाही तर सलून आणि नैसर्गिक घटकांपासून विटा बनवण्याच्या व्यवसायात देखील प्रगती करत आहे. सियाने याअगोदर मुंबईत S Sense salon and spa सुरू केले होते. त्यानंतर चांदीवली स्टुडिओजवळच ‘गाव curry चव महाराष्ट्राची’ नावाने पहिले हॉटेल सुरू केले यानंतर ‘तवस’ नावाने तिने दुसरे हॉटेल सुरू केले. काही दिवसांपूर्वीच सियाने बारामती शहरात s sense salonची दुसरी शाखा सुरू केली. तर काहीच दिवसात आता तिने आपल्या तिसऱ्या हॉटेलची घोषणा करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अंधेरी पूर्व येथे Brunch Baron Cafeteria या नावाने तिने तिसरे हॉटेल सुरू केले आहे. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर या हॉटेलचा शुभारंभ पार पडत आहे. सियाच्या हॉटेल व्यवसायातील हे धाडस खूपच कौतुकास्पद आहे.
हॉटेल व्यवसायात उतरणं, ते सांभाळणं भल्याभल्यांना जमलेलं नाही. पण तिने तिच्या हिमतीवर हे करून दाखवलं आहे. आणि म्हणूनच सिया पाटीलचे सर्वच स्तरातून मोठे कौतुक होत आहे. खरं तर स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासूनची तिची जिद्द आज तिला या यशाच्या शिखरावर घेऊन आली आहे. सियाचा स्ट्रगल खूपच मोठा आहे. वडीलांपाठोपाठ भावाचे निधन अशा अनेक घटना तिच्या आयुष्यात दुःख देऊन गेल्या. पण तरीही येणाऱ्या अडचणी, मोठमोठाली संकटं पार करत तिने हे यश संपादन केलं आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी सिया अभिनित करत असलेला ‘रंगीले फंटर ‘ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यासाठीही तिचे खूप खूप अभिनंदन आणि या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.