छडी लागे छम छम विद्या येई… हे लोकप्रिय गीत आहे श्यामची आई या गाजलेल्या चित्रपटातलं. १९५३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री वनमाला, दामू अण्णा जोशी, सुमती गुप्ते, बाबुराव पेंढारकर अशा मातब्बर कलाकारांनी हा चित्रपट अभिनित केला होता. साने गुरुजींच्या श्यामची आई ह्या पुस्तकाचा आधार घेऊन आचार्य अत्रे यांनी यावर चित्रपट बनवण्याचे ठरवले. यात श्यामची मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा म्हणजेच “माधव वझे” यांचा आज २१ ऑक्टोबर रोजी ८२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल थोडक्यात आढावा घेऊयात…
माधव वझे यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३९ रोजी पुणे येथील वझे कुटुंबात झाला. शनिवारवाड्या समोरच त्यांचे घर होते. लहानपणापासुन ते हुशार नि चुणचुणीत होते. त्यांचे शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयात झाले. शाळेत असताना नाटकात भाग घेणे, श्लोक, कविता यांचे पाठांतर करायचे. आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ या पुस्तकावर चित्रपट बनवायचे ठरविले. श्यामची आई म्हणुन वनमाला यांची निवड झाली आणि श्यामच्या भूमिकेसाठी एका लहान मुलाला बोलावले. चित्रीकरणास सुरुवातही झाली होती, पण वनमालाबाईंना तो मुलगा काही पसंत पडला नाही. म्हणुन चित्रीकरण थांबवुन श्यामसाठी दुसऱ्या मुलाचा शोध सुरु झाला. केशवराव भोळे आणि ज्योत्स्ना भोळे या सांगीतिक दांपत्याने आचार्य अत्र्यांना लहानग्या माधवचे नाव सुचवले. अत्रे मग माधवच्या घरी आले, त्यांच्या आईवडिलांशी बोलले. अत्र्यांना तर माधव आवडला होताच पण वनमालाबाईंनाही हा मुलगा श्याम म्हणुन पसंत पडला.
पुढे मुंबईला अन कोकणात चित्रपटाचे चित्रीकरण व्यवस्थित पार पडले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आचार्य अत्र्यांनी श्यामला हत्तीवर बसवुन मुंबईतील दादर विभागात साखर वाटली होती ही एक या चित्रपटाची खास आठवण म्हणावी लागेल. चित्रपट आणि त्यातील गाण्याचे मोठे कौतुक झाले. शिवाय बालकलाकार माधव वझे यांचेही कौतुक करण्यात आले. चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदकही मिळाले असे यश मिळवणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला. माधवजी आचार्य अत्र्यांबरोबर या पुरस्कार समारंभासाठी दिल्लीलाही गेले. या चित्रपटानंतर त्यांनी ‘वहिनीच्या बांगड्या’ या चित्रपटात बालकलाकाराची भुमिका केली. हा चित्रपट देखील तुफान यशस्वी ठरला. शालेय शिक्षण संपल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी पुण्याच्याच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात घेतले पुणे विद्यापीठातुन मराठी आणि इंग्रजीमध्ये एम. ए. केले. त्यानंतर नेस वाडिया महाविद्यालयात त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. ललित कला केंद्रात नाट्यविषयक प्राध्यापक म्हणुनही काम केले. अभिनेता, दिग्दर्शक, नाट्यशिक्षक आणि नाट्यसमीक्षक या नात्याने त्यांनी विविध ठिकाणी आयुष्यभर आपली सेवा केली. त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. त्यातले एक महत्वाचे पुस्तक म्हणजे ‘श्यामची आई’ आचार्य अत्रे आणि मी. पुढे एवढंसं आभाळ, थ्री इडियट्स अशा मोजक्या चित्रपटातुनही काम केले आहे.
थ्री इडियट्स या चित्रपटात त्यांनी काम केले होते. या चित्रपटात आत्महत्या करत असलेला जॉय लोबो तुम्हाला आठवतो का? याच जॉयच्या वडिलांच्या भूमिकेत आपल्याला त्यांना पाहायला मिळाले होते. तसेच त्यांनी काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आलिया भट आणि शाहरुख खानच्या डिअर जिंदगी या चित्रपटात देखील काम केले होते. ते आलिया भटच्या आजोबांच्या भूमिकेत दिसले होते. माधव वझे यांनी केवळ अभिनयाकडेच लक्ष केंद्रित केले नाही तर त्यांनी आपल्या शिक्षणाला देखील तितकेच महत्त्व दिले. ते पेशाने शिक्षक आहेत काहीच वर्षांपूर्वी पुण्याच्या वाडिया कॉलेजमधून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले. अभिनयासोबतच दिग्दर्शनाकडे देखील त्यांचा कल आहे. परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे दिग्दर्शन माधव वझे यांनी केले होते. आज श्यामची आई या चित्रपटाला प्रदर्शित होऊन इतकी वर्षे लोटली तरीही चित्रपटातला निरागस श्याम प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे. माधव वझे यांना वाढदिवसानिमित्त सुदृढ आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा…