अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदे हिने अनेक धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. लागीरं झालं जी ही तिची निर्माती म्हणून झी मराठीवरची पहिली मालिका. तेजपाल वाघ आणि श्वेता शिंदे दोघेही साताऱ्याचे. साताऱ्यात घरोघरी देशसेवेसाठी वाहून घेतलेले जावं आहेत. जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाचे रक्षण करत आहेत. याच मुद्द्याला अनुसरून तेजपाल श्वेताकडे लागीरं झालं जी मालिकेचा विषय घेऊन आला. ग्रामीण बाज आणि आगळा वेगळा विषय श्वेताला आवडल्याने तिने ही मालिका करण्याचे ठरवले. मालिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. त्यानंतर देवमाणूस सारख्या मालिका तिने निर्मित केल्या. याही मालिका प्रचंड प्रमाणावर गाजल्या.
कलर्स मराठी वाहिनीवर तिने शेतकरीच नवरा हवा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली. मालिकेने नुकताच ५० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. या मालिकेच्या निमित्ताने श्वेता शिंदे हिने या निर्मिती मागची एक गोष्ट सांगितली. खरं तर शेतकरीच नवरा हवा या शिर्षकाप्रमाणे शेतकऱ्याला लग्नासाठी आता कोणी मुलगी देत नाही हा मुद्दा इथे खोडुन काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या परिस्थितीला आजही गावाकडचे अनेक तरुण तोंड देत आहेत. सततचा दुष्काळ, पिकांना हमीभाव नाही, अवकाळी परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान. अस्मानी संकटांमुळे कोणी बाप आपल्या मुलीला शेतकऱ्याच्या घरात द्यायला तयार होत नाही. पण मालिकेची शहरातील नायिका गावी येते आणि तरुण शेतकऱ्याच्या प्रेमात पडते.
असे हे कथानक महाराष्ट्राच्या गावागावात पाहायला मिळावे अशी आशा प्रत्येकालाच आहे. शेतकरीच नवरा हवा मालिका काढण्यासाठी श्वेताला तीच्या आईने हा विषय सुचवला होता. हा किस्सा सांगताना श्वेता म्हणते की, माझ्या आईची साताऱ्यातील एमआयडीसीमध्ये फॅक्टरी आहे. फॅक्टरीमध्ये अनेक वर्षे काम करणारा एक कामगार आईकडे हा विषय घेऊन आला. एकत्र कुटुंब असून धाकटा भाऊ गावी शेती करतो, मी इथे नोकरीला आहे. पण शेतकरी असल्याने त्याला कोणी मुलगी द्यायला तयार होत नाही. श्वेताच्या आईला ही गोष्ट मनाला लागली. त्यांनी लगेचच हा मुद्दा श्वेतासमोर मांडला. आणि आपण अशा अडचणी लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे हे तिला सांगितले. त्यावरून मी ही मालिका करण्याचा निर्णय घेतला. लोकांनाही ही मालिका आवडते आणि त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे.