नथुराम गोडसे आणि मी नथुराम गोडसे बोलतोय हे दोन नाटक एकाचवेळी रंगभूमीवर पुन्हा एकदा दाखल होत आहेत. यामुळे नथुराम विरुद्ध नथुराम हा नवा वाद पेटला आहे. उदय धुरत यांनी नाटकाचे शीर्षक चोरल्याचा आरोप शरद पोंक्षे यांच्यावर लावला आहे. यावरून धुरत यांनी शरद पोंक्षे यांना तीन वेळा नोटीस पाठवली आहे. मराठी रंगभूमीवर जे दीडशे वर्षात घडलं नाही ते या नाटकामुळे शिर्षकासह नाटकाची संहिताच चोरी गेल्याचा निंदनीय प्रकार घडत आहे. असे मत उदय धुरत यांनी शरद पोंक्षे यांचे नाव न घेता व्यक्त केलं आहे. यामुळे नाटकाचे श्रेय लाटण्याची परंपरा सुरू होईल अशी भीती निर्माते उदय धुरत यांनी बोलून दाखवली आहे.
प्रदीप दळवी लिखित मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक निर्माते उदय धुरत यांनी १९९८ साली रंगभूमीवर आणले होते. शरद पोंक्षे हे या नाटकात प्रमुख भूमिका साकारत होते. त्यावेळी हे नाटक खूप चर्चेत आलं होतं. नाटकाचे ८१६ प्रयोग झाले त्यानंतर धुरत यांनी हे नाटक थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर हेच नाटक धुरत यांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर आणण्याचा निर्णय घेतला. हे नाटक ऑक्टोबर मध्ये येणार असल्याची जाहिरात जुलैमध्येच पेपरमध्ये छापून आली होती. अभिनेता सौरभ गोखले या नाटकातून नथुरामची भूमिका साकारणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. येत्या ३ ऑक्टोबरपासून नाटकाची तालीम सुरू होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात हे नाटक रंगभूमीवर दाखल होईल असे सांगितले जात आहे.
एकीकडे या नाटकाची घोषणा झाली त्याच्याच दुसऱ्या बाजूला शरद पोंक्षे यांनी देखील आपण हे नाटक रंगभूमीवर आणतोय असे ऑगस्ट महिन्यात जाहीर केले. शरद पोंक्षे या नाटकाचे केवळ ५० प्रयोगच करणार आहेत. ७ ऑक्टोबर रोजी या नाटकाचा प्रयोग होणार आहे. दरम्यान धुरत यांनी शरद पोंक्षे यांच्यावर नाटकाचे शीर्षक चोरल्याचे आरोप लावले आहेत. यासंदर्भात न्यायालयीन लढाई लढेन असे धुरत यांनी म्हटले आहे. तर शरद पोंक्षे यांचे याबाबत म्हणणे आहे की, मी २०१६ साली सेन्सॉर कडून या नाटकाचे प्रमाणपत्र घेतले आहे. मी नथुराम गोडसे बोलतोय या एकमेव नाटकाच्या शिर्षकाची नोंद सेन्सॉरकडे झाली आहे, असे शरद पोंक्षे यांचे म्हणणे आहे.