झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला ही लोकप्रिय मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली आहे. या मालिकेतील मुख्य नायक म्हणजेच शाल्व किंजवडेकर आता लवकरच लग्नबांधनात अडकताना दिसणार आहे. ओमला त्याची स्वीटू मिळाली अशी गोंडस प्रतिक्रिया चाहत्यांकडून त्याला मिळू लागली आहे. ओम म्हणजेच शाल्व किंजवडेकर आणि त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफळापुरकर यांच्या साखरपुड्याची लगबग कालपासून सुरू झालेली आहे. काल दोघांचा मेहेंदीचा सोहळा थाटात पार पडला, यावेळी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सह आणखी काही सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली.

मेहेंदीच्या सोहळ्यात श्रेयाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, तर शाल्वने देखील पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला. सोहळ्यात अनेक मित्रमंडळी आणि नातेवाईक हजेरी लावताना दिसले. या सर्वांनी शाल्व आणि श्रेयाच्या मेहेंदी सोहळ्यात गाण्यावर ठेका धरत हा सोहळा अधिक रंगतदार केलेला पाहायला मिळाला. आज या दोघांचा मोठ्या थाटात साखरपुडा पार पडणार आहे. साखरपुड्याला मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित केलेलं आहे. त्यामुळे साखरपुड्यातील त्यांच्या लुकची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेमुळे शाल्व प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला होता. मराठी आणि हिंदी चित्रपटातून सहाय्यक भूमिका ते मराठी मालिकेतून प्रमुख भूमिका असा त्याचा हा प्रवास खरोखरच उल्लेखनीय आहे.

शाल्व गेल्या काही वर्षांपासून अभिनय क्षेत्रात यश मिळवत आहे, तर श्रेया देखील कलासृष्टीशी निगडित असलेली पाहायला मिळते. श्रेयाने मॉडेलिंग क्षेत्रात शिक्षण घेतले असून मराठी सृष्टीतील काही सेलिब्रिटींच्या कपड्यांच्या ब्रॅण्डसाठी तिने मॉडेलिंग केले होते. सध्या मराठी चित्रपटासाठी श्रेयाने कॉस्टयूम डिझानर म्हणून जबाबदारी संभाळलेली आहे. सोनाली कुलकर्णी हिच्या तिचं शहर होणं या चित्रपटासाठी तिने काम केले होते. शाल्व आणि श्रेया कॉलेजपासून एकमेकांना डेट करत आहेत. इतक्या वर्षांच्या डेटनंतर आता ते साखरपुडा करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या साखरपुड्याच्या लुकची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. शिवाय या सोहळ्याला कोणकोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याचीही उत्सुकता आहेच.