मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेते डॉ विलास उजवणे यांना गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांच्यावर गेल्या सहा वर्षांपासून उपचार सुरू आहेत. मात्र या आजाराने डोकं वर काढल्याने त्यांना वारंवार ब्रेनस्ट्रोकला सामोरे जावे लागत आहे. विलास उजवणे यांनी तानी, वादळवाट, थांब लक्ष्मी थांब, पागलपन अशा हिंदी मराठी चित्रपट तसेच मालिकेतून काम केले आहे. त्यांच्या पत्नी अंजली उजवणे या देखील अभिनेत्री आहेत. मात्र आजारपण बळावल्याने जवळचे होते नव्हते तेवढे सगळे पैसे उपचारासाठी खर्च झाले आहेत.
सततच्या उपचार खर्चामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना हृदयाच्या विकाराने देखील त्रास होऊ लागला आहे. त्यात आता त्यांना काविळीचे देखील निदान झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचे सुचवले आहे, यासाठी विलास उजवणे यांच्या जवळचे मित्र राजू कुलकर्णी यांनी मदतीचे आवाहन केले आहे. एक मनस्वी आवाहन, माझ्या जेष्ठ मित्रासाठी! मित्रांनो, आज एक गोष्ट सांगताना मला फार वाईट वाटत आहे की हा राजा माणूस म्हणजे आमचा लाडका डॉक्टर मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेली सहा वर्षे ब्रेन स्ट्रोकशी झुंज देणाऱ्या हा वाघ थोडा थकला आहे. अत्यंत साध्या सदनिकेत राहणारा हा कलाकार आपल्या आयुष्याची सर्व पुंजी या आजारांमध्ये खर्च करून बसला आहे.
ती रक्कम थोडी थोडकी नाही. चांगली सुधारणा होत आहे असे वाटत होते, बाहेर पडत होते. कुठे परीक्षक तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून त्याच्या चाहत्यांना दिलासा देत होते. लवकरच हे आपली सेकंड इनिंग चालू करणार असे वाटत असताना नियती त्यांच्या पुढे दोन मोठ्या आजारांचे निष्ठुर दान टाकून निघून गेली. ह्रदयविकाराचा त्रास झाला असून त्याचे मोठे ऑपरेशन तातडीने करणे अत्यावश्यक आहे. त्यात एक वेगळ्या काविळीची भर पडली आहे, ही लाखोकरोडो लोकांमधे एखाद्यास होते. त्यामुळे शरीरातील इतर ऑर्गनसवर वाईट परिणाम करत आहे. ह्या कारनामुळे छोटी इस्पितळे त्यांना दाखल करत नाही. कोल्हापूरच्या इस्पितळात होते पण परत यावे लागले.
आता एकच उपाय मुंबई मधील मोठे हॉस्पिटल! तिथेच हे शक्य आहे, त्यामुळे खुपसा खर्च डोळ्यासमोर आ वासून उभा आहे. डॉक्टरजवळ असलेली गंगाजळी फारच त्रोटक आहे त्यात जवळ असलेल्या मेडिक्लेम व इतर पॉलिसी देखील संपुष्टात आल्या आहेत. गेली सहा वर्षे आजारात आणि जवळ काम नाही त्यात हे नवीन आजार. तेव्हा ह्या चक्रव्युहातून या अभिमन्यूची सुटका होण्यासाठी आपण सर्व मित्रांनी खारीचा का होईना वाटा उचलू!