मराठी तसेच हिंदी मालिका आणि चित्रपटांत आपल्या दमदार अभिनयाने अनंत जोग यांनी विरोधी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात धास्ती भरवली. मालिकांसोबत पुष्कळ सिनेमांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. काही मराठी मालिकेत त्यांनी हळव्या नायकाच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय साकारला. सरकार, सिंघम, विजयपथ, रावडी राठोड, नो एन्ट्री, शांघाय, दहेक, कच्ची सडक, लाल सलाम, रिस्क या बॉलीवूड सिनेमातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायमच्या लक्षात राहिल्या.

चित्रपटसृष्टी कर्मभूमी असलेल्या अनंत जोग यांनी एका मराठी अभिनेत्रीसोबत विवाह केला. अनंत जोग यांच्या पत्नीचे नाव आहे उज्जवला जोग. उज्जवला जोग याही टीव्ही मालिका तसेच रंगभूमीवरील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. कुंकू लावते माहेरचं, नवरा बायको, सौभाग्य कांकन या मालिकेत त्यांनी काम केले आहे. सूर्याची पिल्ले, ढोल ताशे, लुका छुपी हि त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत. अनंत आणि उज्जवला जोग यांना क्षिती नावाची मुलगी आहे. क्षिती देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. तिची ‘दामिनी’ मालिकेतील इन्स्पेक्टरची भूमिका विशेष गाजली होती. गंध फुलांचा गेला सांगून, तू तिथे मी या मालिकांत तिने काम केले आहे. घर की लक्ष्मी बेटियां, साराभाई vs साराभाई, ये रिशता क्या केहलता है या हिंदी मालिकेतही तीने उत्तम भूमिका साकारल्या आहेत.

क्षिती जोग हिने २४ एप्रिल २०१२ साली अभिनेता हेमंत ढोमे सोबत लग्न केले. हेमंत ढोमे हा देखील मराठी चित्रपट सृष्टीतील उत्तम अभिनेता, लेखक आणि दिगदर्शक आहे. त्याने ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाचे लेखन तसेच दिग्दर्शनही केले आहे. चोरीचा मामला, येरे येरे पैसा, बस स्टॉप, फुगे, फुद्दु, पोस्टर गर्ल, ऑनलाईन बिनलाईन, काय राव तुम्ही, हुतूतू, आंधळी कोशिंबीर, जय जय महाराष्ट माझा, क्षणभर विश्रांती या चित्रपटात काम करुन प्रेक्षकांसमोर आपल्या अभिनयाची वेगळीच छाप पाडली आहे. झिम्मा, सातारचा सलमान हे त्याचे नुकतेच प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट. अभिनय क्षेत्राला सर्वस्व वाहिलेल्या अशा या जोग कुटुंबाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.