सोनी मराठीवरील जीवाची होतीया काहिली या मालिकेतील अर्जुन आणि रेवथीची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. राज हंचनाळे, प्रतीक्षा शिवणकर यांनी ही भूमिका सहसुंदर वठवली असल्याने मालिकेला अधिक रंग चढला आहे. या दोघांना विद्याधर जोशी, अतुल काळे, सीमा देशमुख, गार्गी रानडे, भारती पाटील, श्रुतकीर्ती सावंत या कलाकारांची साथ मिळाली आहे. मालिकेतील प्रेमकहाणीत मात्र आप्पा आणि तात्यांचे भांडण नेहमीच आडकाठी आणणारे ठरले आहेत. त्यामुळे या हे दोघे कधी एकत्र येणार याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. दरम्यान आप्पा आणि तात्यांचा वाद मीटावा म्हणून एका प्रसिद्ध अभिनेत्याची मालिकेत एन्ट्री करण्यात आली आहे.
ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांची १५ ऑगस्ट रोजी मालिकेत एन्ट्री करण्यात आली. गावात झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो त्यावेळी झेंडावंदनाचा मान कोण मिळवणार यावरून आप्पा आणि तात्यांमध्ये भांडण होते. हे भांडण मिटवण्यासाठी गावचे ज्येष्ठ पुढारी म्हणजेच भास्कर आनंद यांची एन्ट्री दणक्यात झालेली पाहायला मिळाली. ही भूमिका अच्युत पोतदार साकारताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आप्पा आणि तात्यांचा वाद भास्कर आजोबा नक्कीच मिटवणार असा विश्वास मालिकेच्या प्रेक्षकांना वाटत आहे. अच्युत पोतदार यांनी अनेक गाजलेल्या हिंदी, मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. माझा होशील ना या मालिकेत त्यांनी आजोबांची भूमिका साकारलेली पाहायला मिळाली होती.
मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी या मालिकेचे शूटिंग घरी राहूनच केले होते. या मालिकेनंतर ते पुन्हा एकदा जीवाची होतीया काहिली या मालिकेतून छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या येण्याने मालिकेला एक नवे वळण मिळाले असून आप्पा आणि तात्या कधी नव्हे ते एकत्र येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी देखील ते मालिकेत सक्रिय असल्याने त्यांचा हा उत्साह नवख्या कलाकारांना स्फूर्ती आणि प्रेरणा देणारा ठरला आहे. अच्युत पोतदार यांना पुन्हा एकदा दमदार भूमिकेत पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. या नवीन भूमिकेसाठी अच्युत पोतदार यांना खूप खूप शुभेच्छा!