नवीन वर्षाची चाहूल लागताच, दिनदर्शिका म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते कालनिर्णयचं. सणांची माहिती, नामवंत लेखकांचे लेख, पाककृती, आरोग्य, पंचांग अशा विविध सदरांची माहिती कालनिर्णय मध्ये सोप्या भाषेत देण्यात येते. त्यामुळे वाचणाऱ्यालाही ते सोईस्कर ठरते. ज्योतिषतज्ञ, लेखक, पत्रकार असलेल्या जयंत शिवराम साळगावकर यांनी १९७३ साली कालनिर्णय दिनदर्शिका प्रकाशित केली होती. पुढे तब्बल ९ भाषांमध्ये ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येऊ लागली. पाहता पाहता एकट्या मराठी भाषेतील कालनिर्णयचा खप ४८ लाखांपर्यंत जाऊन पोहोचला. कालांतराने कालनिर्णय हा आंतरराष्ट्रीय ब्रँड म्हणून नावारूपाला आला.
कालनिर्णयच्या विविध जाहिराती प्रेक्षकांना अगदी तोंडवळणी पडल्या आहेत. भिंतीवर कालनिर्णय असावे असे म्हणत सुधीर जीशी, सुहास जोशी, सुरेश भागवत यांची जाहिरात आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ९० च्या दशकात दिलीप प्रभावळकर यांनी ही जाहिरात एकट्याने केली, ते एका किर्तनकाराच्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर अहो कालनिर्णय द्या ना, कालनिर्णय घ्या ना अशा आशयाची तीन भाषेत जाहिरात बनवली गेली. प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना जोगळेकर, रेणुका शहाणे, कृतिका देसाई, अजय वढावकर यांनी काम केले. मधल्या काळात किशोर कदम यांनी देखील ही जाहिरात एका वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणली. आता कालनिर्णय द्या ना असे म्हणत ही जाहिरात पुन्हा एकदा एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव कालनिर्णयने यावर विचार केला आणि ही जाहिरात नव्या रुपात आणण्याचे ठरवले. सायली संजीव, समीर चौघुले, पूजा साळवी, उर्वी सिंग अशा कलाकारांनी ही जाहिरात पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. टिळक शेट्टी यांनी ही जाहिरात दिग्दर्शित केली आहे. ही जाहिरात पाहून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, अशीही आठवण काढली जात आहे. मात्र या जाहिरातीतील पुढचा भाग कट करण्यात आल्याने प्रेक्षकांनी काहीशी नाराजी दर्शवली आहे. भविष्य, मेनू, आरोग्य ज्ञान, उपयुक्त साहित्य प्रत्येक पान, पंचांग सोपे सुमंगल करावे, भिंतीवर कालनिर्णय असावे. या ओळी नवीन मिसिंग आहेत, ही खंत जाणकार प्रेक्षकांनी अधोरेखित करून दिली आहे. त्यावरही विचार व्हावा अशी मागणी या प्रेक्षकांनी केली आहे.