सतीश पुळेकर हे उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून मराठी इंडस्ट्रीत ओळखले जातात. अगदी प्रशांत दामले सह अनेक नामवंत कलाकारांना घडवण्याचे त्यांनी काम केलेले आहे. नाटकांचे दिग्दर्शन करत असताना शिस्तबद्ध राहणे आणि वेळ पाळणे अशा गोष्टींमुळे ते प्रचंड कडक शिस्तीचे असल्याचा शिक्का त्यांच्यावर बसला. याचमुळे हळद रुसली कुंकू हसलं, बे दुणे साडेचार, पोलीस लाईन, येडा, गोळाबेरीज अशा दर्जेदार चित्रपटातून काम केल्यानंतरही त्यांना पुढे डावलले गेले. विक्रम गोखले यांना दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपली ही खंत बोलून दाखवली होती. आई थोर तुझे उपकार या चित्रपटावेळी तर त्यांनी एका अभिनेत्याला कानाखाली वाजवली होती.
अशी अफवा त्यावेळी पसरली होती, त्यामुळे त्यांची या इंडस्ट्रीत वेगळी इमेज तयार झाली होती. पण यातही गॉसिप करणे, ग्रुपशी जोडला गेलो नसल्याने आपल्याला या इंडस्ट्रीने अलगद बाजूला केले ही खंत ते व्यक्त करत होते. कलाकार म्हटलं की तुम्हाला सतत चर्चेत राहणं गरजेचं असतं. मात्र मुळातच त्यांचा स्वभाव तसा नसल्याने या इंडस्ट्रीत त्यांना काम मिळवणे कठीण होऊ लागले. कित्येक दिवसच नाही तर महिनोन्महिने त्यांना काम मिळत नव्हते. मात्र या मुलाखतीनंतर सतीश पुळेकर मराठी इंडस्ट्रीत पुनरागमन करताना दिसले. मधल्या काळात त्यांच्या वाट्याला अशाच छोट्या छोट्या भूमिका आल्या त्या त्यांनी उत्तम निभावल्या. आता लवकरच ते मराठी पाऊल पडते पुढे या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
मराठी पाऊल पडते पुढे चित्रपटात चिराग पाटील आणि सिद्धी पाटणे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. सोबतच सतीश पुळेकर, अनंत जोग, सतीश सलगरे, संजय कुलकर्णी अशी कलाकार मंडळी महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. मराठी पाऊल पडते पुढे चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. चिराग पाटील या चित्रपटात एका मराठमोळ्या व्यवसायिकाची भूमिका साकारत आहे. मराठी माणसाने व्यवसाय क्षेत्रात उतरलं पाहिजे असा एक मेसेज या चित्रपटातून देण्यात आला आहे. सतीश पुळेकर यात एका सर्वसामान्य गृहस्थाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटामुळे बऱ्याच प्रतीक्षेनंतर सतीश पुळेकर यांचे पुनरागमन होत आहे, हे पाहून त्यांच्या चाहत्यांनाही तेवढाच आनंद झाला आहे.