सुप्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार सलील कुलकर्णी यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यांच्यासोबत प्रतिभासंपन्न कवयित्री, लेखिका शांताबाई शेळके बसल्या आहेत. शांताबाई शेळके यांची अनेक गीतं अजरामर झाली. आज चांदणे उन्हात हसले,आधार जिवा, ऋतु हिरवा, ऋतु बरवा, कशि गौळण राधा, कळले तुला काही. काटा रुते कुणाला, कान्हू घेउन जाय, काय बाई सांगू, गणराज रंगी नाचतो, छेडियल्या तारा. जय शारदे वागीश्वरी, जीवनगाणे गातच रहावे, जे वेड मजला लागले, तोच चंद्रमा नभात, दाटून कंठ येतो. दिसते मजला सुखचित्र, निळ्या अभाळी कातरवेळी, पप्पा सांगा कुणाचे अशी अनेक चित्रपट गीतं कविता शांताबाई यांनी लिहिली.
बालसाहित्यिका, पत्रकार आणि प्राध्यापिका म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. लता दीदींनी शांताबाई शेळके यांच्या अनेक गीतांना स्वरबद्ध केलं आहे. अशाच एका आठवणीत सलील कुलकर्णी यांनी हा फोटो शेअर केला आहे. या आठवणींना उजाळा देताना सलील कुलकर्णी म्हणतात की, राजा सारंगा, मागे उभा मंगेश, तोच चंद्रमा, रेशमाच्या रेघांनी ऋतू हिरवा. हा माझा मार्ग एकला, विहीणबाई उठा आता उठा, चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. जिवलगा राहिले रे दूर घर माझे, काटा रुते कुणाला? हे आणि असे अनेक शब्दांचे टोलेजंग बंगले, वाडे, इमारती असणाऱ्या ह्या आजी, स्वतः पायऱ्या उतरून नवीन माणसाला भेटायला यायच्या. तो होऊ दे मोठा मग भेटते त्याला, असले हिशोब त्यांच्या गावी नव्हते. ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा असं म्हणणारी एक स्त्री तर होतीच.
स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई, किलबिल किलबिल पक्षी बोलती असं म्हणणारी एक शाळकरी मुलगी सुद्धा होती. मागते मन एक काही दैव दुसरे घडविते, असं नियतीला स्वीकारणं पण होतं! आज हा फोटो पाहतांना, दोन गोष्टी मनात फार प्रकर्षाने आल्या. पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, शांताबाई अशा पुन्हा कधी दिसणारच नाहीत, हे काही आवडत नाहीये. दुसरी म्हणजे, हे असं इतकं साधं राहता आलं तर आपल्याला पैलामधले काही उजळलेले दिसेल? फोटोत १९९९ ला एका नवीन संगीतकाराच्या रेकॉर्डिंगला अत्यंत उत्सुकतेने आलेल्या गोड आजी, शांताबाई शेळके. आपलं गाणं ऐकायला आले असं म्हणणाऱ्या, आजीच्या रूपात सरस्वती भेटून गेली. आज त्यांचा वाढदिवस नाही आणि तिथी पण नाही पण, आज ह्या फोटोशी खूप बोललो! प्रत्येक फोटोची एक गोष्ट असतेच, ही ह्या फोटोची गोष्ट.