मराठी सृष्टीत कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. लवकरच अभिनेता प्रथमेश परब त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या पहिल्या वहिल्या केळवणाचा थाट सजलेला पाहायला मिळाला होता. अशातच काल शनिवारी मराठी चित्रपट तसेच नाट्य अभिनेता ऋषी मनोहर याचे मोठ्या थाटात लग्न पार पडलेले पाहायला मिळाले. डेंटिस्ट असलेल्या पुण्याच्या तन्मई पेंडसे सोबत ऋषीने ही लग्नगाठ बांधली आहे. लग्नाला मराठी सृष्टीतील काही मोजक्या सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती.
तर हृता दुर्गुळेने सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋषीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऋषी मनोहर हा मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पौर्णिमा मनोहर यांचा मुलगा आहे. ऋषी मनोहर हा आईच्या पावलावर पाऊल टाकत मराठी सृष्टीत दाखल झाला. कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकाचे दिग्दर्शन करत असे. अफरा तफरी, एका काळेचे मनी, वंश अशा नाटक, चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर पौर्णिमा मनोहर यांनी लहान असतानाच चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. स्मिता पाटील यांची प्रमुख भूमिका असलेल्या उंबरठा चित्रपटात पौर्णिमा मनोहर यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. आजवर अनेक मालिका तसेच चित्रपटातून पौर्णिमा मनोहर यांनी विविधांगी भूमिका साकारत आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील ढेपेवाडा येथे पौर्णिमा मनोहर यांनी व्याही भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावरून मुलाच्या लग्नाची लगबग सुरू झाल्याचे त्यांनी जाहीर केले होते. चार दिवसांपूर्वी ऋषी आणि तन्मईच्या लग्नाअगोदरच्या विधींना सुरुवात करण्यात आली होती. ग्रहमख पूजन पार पडल्यानंतर ऋषी आणि त्याचे कुटुंबीय लग्नस्थळी दाखल झाले होते. मेंदी सोहळा, संगीत सोहळा आणि त्यानंतर त्यांच्या हळदीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला होता. तर त्यांच्या लग्नसोहळ्याचा थाट देखील पाहण्याजोगा होता. लग्नसोहळ्याचे काही खास क्षण या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तूर्तास ऋषी मनोहर आणि तन्मई पेंडसे या नवविवाहित दाम्पत्यास आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.