स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेने आता १४ वर्षांचा लीप घेतला आहे. त्यामुळे मालिकेत कार्तिकी आणि दीपिका मोठ्या दाखवण्यात आल्या आहेत. दीपाने कार्तिकच्या विरोधात साक्ष दिल्यानंतर आता कार्तिक आपली शिक्षा भोगून पुन्हा बाहेर पडणार आहे. या इतक्या वर्षात मालिकेत खूप मोठा बदल घडून येत आहे. दीपिका आणि कार्तिकीच्या भूमिकेत ज्या बालकलाकारांना अभिनयाची संधी मिळाली होती त्या स्पृहा दळी आणि मैत्रेयी दाते यांनी नुकतीच मालिकेतून एक्झिट घेतली आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून आदित्यची भूमिका साकारणारा अंबर गणपुळे याने देखील मालिकेला रामराम ठोकला आहे.
सध्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या लोकमान्य मालिकेत तो आगरकरांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे अंबरला या दोन्ही मालिकेतून काम करता येणे शक्य नव्हते. पुरेशा वेळेअभावी त्याने आता रंग माझा वेगळा मालिकेतून काढता पाय घेतलेला आहे. त्यामुळे आदित्यच्या भूमिकेसाठी मालिकेच्या टीमची शोधाशोध सुरू होती. यातूनच भाग्येश पाटील याला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. भाग्येश पाटील ह्याला तुम्ही ओळखलंही असेल. कारण अग्गबाई सासूबाई मालिकेत भाग्येशने विश्वासची भूमिका साकारलेली होती. भाग्येश कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकातून काम करत होता. तुला पाहते रे या झी वाहिनीच्या मालिकेत पत्रकाराची छोटीशी भूमिका त्याने बजावली होती. सोनी मराठीवरील हम बने तुम बने, झी युवा वरील आम्ही दोघी यासोबतच.
हे विठ्ठला, पंख या शॉर्ट फिल्म तसेच स्ट्रगलर साला मधूनही अभिनयाची झलक दाखवून दिली होती. अग्गबाई सासूबाई मालिकेतील विश्वासच्या भूमिकेने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. स्वराज्यजननी जिजामाता मालिकेत तो ऐतिहासिक भूमिकेत दिसला होता. आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्याला पुन्हा एकदा आभिनयाची संधी मिळालेली आहे. रंग माझा वेगळा मालिकेत आदित्यची भूमिका साकारत आहे. खरं तर ही भूमिका भाग्येश साठी आव्हानात्मक आहे कारण अंबरने ही भूमिका त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात उतरवली होती. त्यामुळे प्रेक्षक आपल्याला या भूमिकेत स्वीकारतील की नाही असा प्रश्न भाग्येशला पडला आहे. मात्र भाग्येश आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं नक्की जिंकून घेईल असा विश्वास आहे. या भूमिकेसाठी भाग्येश पाटीलला खूप खूप शुभेच्छा.