मराठी चित्रपट सृष्टीतील देखणे आणि चिरतरुण अभिनेते म्हणून रमेश देव यांनी ओळख जपली होती. आज रमेश देव यांचा जन्मदिवस आहे. रमेश देव आणि सीमा देव यांचा प्रेमविवाह झाला होता. कोल्हापूर येथील सर्वात मोठे लग्न म्हणून त्यांच्या लग्नाची चर्चा झाली होती. चित्रपटातून एकत्रित काम करत असतानाच रमेश देव पूर्वाश्रमीच्या नलिनी सराफ यांच्या प्रेमात पडले होते. एका सिन दरम्यान भर पावसात त्यांनी सीमा देव यांना प्रपोज केले होते. मात्र हा चित्रपटाचाच भाग असावा असा समज त्यांनी करून घेतला होता. लग्नाच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त रमेश देव यांनी सीमा देव यांच्यासाठी हिऱ्यांच्या बांगड्या भेट म्हणून दिल्या होत्या.
यावेळची एक आठवण सीमा देव यांनी मीडियाशी बोलताना सांगितली होती. त्यावेळी एका सराफाच्या दुकानात त्यांना घेऊन गेले होते. सीमा देव यांना महागड्या भेट वस्तूंची अजिबात आवड नव्हती, तरी देखील अशा भेटवस्तू देण्याचा ते हट्ट करायचे. महागड्या भेटवस्तू घेताना सीमा देव नकार द्यायच्या त्यावेळी रमेश देव एक वाक्य बोलून दाखवायचे. ‘काय माहीत मी उद्या तुझ्यासोबत असेन की नसेन, पण मला आज हे तुझ्यासाठी घेऊ दे’, असे म्हणून त्यांना गप्प करायचे. त्यांच्या या वाक्यावर सीमा देव गहिवरून जायच्या आणि ती भेटवस्तू स्वीकारायच्या. रमेश देव यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लोकांना आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. आपल्या अखेरच्या दिवसात ते चला हवा येऊ द्या शोमध्ये येऊन गेले होते.
तरुणांना लाजवेल असा उत्साह त्यांच्यात पाहायला मिळाला होता. मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीचा प्रदीर्घकाळ अनुभवलेले अभिनेते अशी त्यांची ओळख होती. देखणा चेहरा, उंच पुरे शरीर आणि अभिनयातला एक्का त्यांना चित्रपटातून नायक बनून गेला. आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटातून नायक, खलनायक, सहाय्यक अशा विविधांगी भूमिकेतून त्यांनी काम केले होते. वयाच्या ९३ व्या वर्षी २ फेब्रुवारी २०२२ रोजी रमेश देव यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यावेळी अवघ्या मराठी हिंदी सृष्टीने हळहळ व्यक्त केली होती. सीमा देव यांना अल्झायमर या आजाराने ग्रासले आहे, त्यामुळे त्यांची स्मृती गेलेली आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा त्या ओळखू शकत नाहीत. रमेश देव आता हयातीत नाहीत ही बाब सुद्धा त्यांना माहीत नाही. त्यामुळे सीमा देव या परिस्थितीपासून अनभिज्ञ आहेत.