स्टार प्रवाह वाहिनीचा टीआरपी कमी करण्यासाठी झी मराठी वाहिनीने आता कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. दोन्हीही वाहिन्या एका सरस एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. वाहिन्यांची ही चढाओढ पाहून प्रेक्षक आता आश्चर्यचकित होताना दिसत आहेत. कारण झी मराठी वाहिनी असे दोन नवीन चेहरे प्रेक्षकांसमोर आणणार आहेत जे हिंदी मालिका सृष्टीत गाजलेले आहेत. पारू आणि शिवा या दोन नव्या मालिका दोन दिवसांपूर्वीच झी मराठीवर दाखल झाल्या आहेत. याच जोडीला आता नवरी मिळे हिटलरला आणि पुन्हा कर्तव्य आहे या दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

दोन्ही मालिकेत हिंदी सृष्टी गाजवणारे मराठमोळे नायक झळकणार आहेत. नवरी मिळे हिटलरला या मालिकेत राकेश बापट प्रमुख भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री वल्लरी विराज ही नायिकेची भूमिका साकारणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून राकेश बापट एका कडक शिस्तीच्या नायकाची भूमिका साकारणार असल्याचे दिसून येते. सानिका काशीकर, शर्मिला शिंदे यांची या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. नवरी मिळे हिटलरला ही मालिका गुड्डन तुमसे ना हो पायेगा या मालिकेशी मिळतीजुळती आहे. तर पुन्हा कर्तव्य आहे ही आणखी एक नवी मालिका झी मराठीवर दाखल होत आहे. पुनर्विवाह या मालिकेचा ती रिमेक असणार आहे. या मालिकेत हिंदी मालिका सृष्टी गाजवणारा मराठमोळा अक्षय म्हात्रे प्रमुख भूमिका साकारत आहे.

तर त्याला अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिची साथ मिळणार आहे. दोन मुली असलेला विधुर नायक आणि घटस्फोटित नायिका अशी ही पुन्हा कर्तव्य आहेची कहाणी आहे. अक्षय म्हात्रे याने त्याच्या करिअरची सुरुवात मराठी सृष्टीतूनच केली होती. सावर रे या ईटीव्ही वरील मालिकेतून तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला होता. ऋजुता देशमुख हिच्यासोबत त्याने नायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर अक्षय हिंदी मालिकेत चमकला. घर एक मंदिर, पिया अलबेला, ये दिल मांगे मोअर अशा हिंदी मालिका अक्षयने गाजवल्या आहेत. या मालिकेतून लोकप्रियता मिळालेला अक्षय पुन्हा मराठी मालिकेकडे वळला आहे. पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत त्याची भूमिका प्रेक्षकांना निश्चितच आवडणार आहे. राकेश बापट आणि अक्षय म्हात्रे या दोन्ही कलाकारांचे मराठी सृष्टीतील पुनरागमनासाठी शुभेच्छा.