काल रविवारी २५ सप्टेंबर रोजी कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या रिऍलिटी शोचा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सूर नवा ध्यास नवा या शोचा हा पाचवा सिजन होता. ज्यात अवधूत गुप्ते, महेश काळे यांनी परिक्षकाची भूमिका निभावली तर स्पृहा जोशीचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना एका जागेवर खिळवून ठेवताना दिसले. १५ ते ३५ वयोगट ग्राह्य धरलेल्या या स्पर्धेत केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर सिंगापूर, नेपाळ, इंदोर, भोपाळ, दिल्ली अशा विविध प्रांतातून पाच हजार स्पर्धकांनी सहभागी होऊन ऑडिशन दिली होती. यातून सोळा स्पर्धकांची निवड करण्यात आली. ताला सुरांच्या सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.
आरोही प्रभुदेसाई, उत्कर्ष वानखेडे, शुभम सातपुते, संज्योती जगदाळे, नवाब शेख आणि कल्याणी गायकवाड या सहा स्पर्धकांनी टॉप सहाच्या यादीत प्रवेश केला. महाअंतिम सोहळ्यामध्ये स्पर्धकांमध्ये विजेतेपद जिंकण्यासाठी गाण्याची मैफल आणि संगीत युध्द पाहायला मिळाले. त्यातूनच महाराष्ट्राला उत्कर्ष वानखेडे सारखा राजगायक विजेता म्हणून मिळाला. नागपूरचा उत्कर्ष वानखेडे पाचव्या पर्वाचा विजेता ठरला असल्याने तो खूप भावुक झाला. आपल्या गुरूंनी आपल्यावर घेतलेली मेहनत आज फळाला आली असे तो म्हणतो. माझ्यावर घेतलेल्या कष्टांना न्याय मिळाला असे म्हणत त्याने सहभागी १५ स्पर्धकांचेही आभार मानले. प्रसिद्ध संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्यातील आनंदजी यांनी महाअंतिम सोहळ्यात उपस्थिती लावली होती.
आनंदजी यांच्या हस्ते विजेता स्पर्धक उत्कर्ष वनखेडेला सुवर्ण कट्यार देण्यात आली. उत्कर्षला कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये बक्षीस दिले गेले. तसेच चंदूकाका सराफ आणि सन्स यांच्याकडून सुवर्ण कटयार मिळाली. यासोबतच केसरी टूर्सतर्फे कश्मीरची टूर आणि तोडकर संजीवनी कडून इलेक्ट्रिक स्कूटर भेट म्हणून देण्यात आली. संज्योती जगदाळे ही या पर्वाची उपविजेती ठरली. तिला कलर्स मराठीकडून एक लाखाचा धनादेश, केसरीकडून केरळ टूर, महाभृंगराज ऑइल कडून पंचवीस हजाराचा धनादेश मिळाला. तसेच आरोही प्रभुदेसाई ही दुसरी उपविजेती ठरली. तिला कलर्स मराठीकडून ७५ हजारांचा धनादेश, हिमाचल सफर व पंचवीस हजाराचा धनादेश मिळाला. विजेता स्पर्धक राजगायक उत्कर्ष वानखेडे तसेच सर्व स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन!.