प्रसिद्ध कवी ना धो महानोर यांचे आज सकाळी ८.३० वाजता दुःखद निधन झाले. नामदेव धोंडो महानोर हे त्यांचं पूर्ण नाव, ते ८१ वर्षांचे होते. ना धो महानोर हे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. पुण्यातील रुबी हॉलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र उपचार सुरू असतानाच प्रकृती अधिक खालावली आणि अशातच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ना धो महानोर हे निसर्गकवी, रानकवी म्हणून ओळखले जात. सर्जा, जैत रे जैत, दूरच्या रानात केळीच्या बनात सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली होती.

झी मराठीवरील नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमासाठी त्यांनी गीतरचना गायल्या होत्या. जाळीमधी झोंबतोया गारवा, तुम्ही जाऊ नका हो रामा अशी गीतं त्यांनी रचली होती. महानोरांच्या कविता ह्या मुख्यत: निसर्गाशी संबंधित असत. कवि आपल्या लेखनीतून निर्सगाचे त्याला भावलेले वर्णन वाचकापर्यंत नुस्ते पोहचवतच नाही तर त्यांना आपल्या सोबत त्याचा भावविश्वात घेउन जातो. त्यांचा कविता वाचताना आपल्यातील एका वेगळ्याच मी ची जाणिव झाल्याशिवाय राहत नाही. हा मी जसा निसर्गाच्या वर्णनाने आंनदतो तसाच तो अंतर्मूख झाल्याशिवाय राहत नाही.अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेलं पळसखेड हे ना धो महानोर यांचे मूळ गाव. आईवडील दोघेही दुसऱ्यांच्या शेतीत काम करायचे. शालेय शिक्षणात हुशार असलेल्या महानोर यांना कवितांची आवड निर्माण झाली.

आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने वडिलांना शेतीच्या कामासाठी त्यांनी हातभार लावला. अशातच निसर्गाशी त्यांची नाळ जोडली गेली. सहज सुचणाऱ्या निसर्गाशी निगडीत असलेल्या कविता त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कविता इतक्या बोलक्या होत्या की त्यातून निसर्गाशीच संवाद साधतोय असे वाटत असे. पळसखेडची गाणी हा कवितांचा संग्रह त्यांनी आपल्या आईला समर्पित केला होता. ना धो महानोर यांनी राजकीय क्षेत्रातही उतरण्याचे धाडस दाखवले होते. भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार, कृषीरत्न पदक, कृषी भूषण पुरस्कार, वनश्री पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, मराठवाडा भूषण पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. ना धो महानोर यांच्या जाण्याने साहित्यविश्वात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.