मराठी सृष्टीतील बरेचसे सेलिब्रिटी उच्चशिक्षित आहेत. कोणी डॉक्टर, वकील, शिक्षक तर कोणी इंजिनिअर सारख्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. आज अशाच एका अभिनेत्रीने शूटिंगच्या व्यस्त शेड्युल मधूनही उत्तम गुण मिळवून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. ही अभिनेत्री आहे प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ता गायकवाड ही मराठी सृष्टीत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. झी मराठीवरील नांदा सौख्यभरे या मालिकेतून प्राजक्ताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर चेकमेट, तू माझा सांगाती, स्वराज्यरक्षक संभाजी, आई माझी काळूबाई अशा मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.
मालिका चित्रपटातून काम करत असताना प्राजक्ताने तिच्या शिक्षणालाही वेळ दिला होता. अगदी स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका सुरू असताना मोकळ्या वेळेत सेटवर ती अभ्यास करत असायची. नुकतेच प्राजक्ताने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. आणि त्यात तिने फर्स्ट क्लास विथ डिस्टिंगशन गुण मिळवलेले आहेत. पुण्यातील ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधून ती इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. इंजिनिअरिंगचे शिक्षण आणि शूटिंग अशी तारेवरची कसरत करत तिने ही पदवी प्राप्त केली आहे. प्राजक्ता गायकवाड मधल्या काळात दाक्षिणात्य चित्रपटात काम करत होती. यावेळी कॉलेजने आणि तिथल्या शिक्षकांनी तिला मोठे सहकार्य केले होते.
एक यशस्वी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता गायकवाडला एक वेगळी ओळख मिळालेली आहे.अशातच तिने स्वतःच्या पायावर उभं राहत हक्काच्या घराचं स्वप्न साकार केलं आहे. मराठी सृष्टीतील एक दमदार नायिका म्हणून स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. महाराणी येसूबाईंच्या भूमिकेने प्राजक्ता प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. मानसन्मान आदर, सत्कार अशा अनेक गोष्टी तिला खूप कमी वयातच अनुभवायला मिळाल्या. त्यामुळे तिचे सर्वच स्तरातून मोठे कौतुक केले जात आहे. उत्तम गुण मिळवून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेल्या प्राजक्ता गायकवाड हिचे मनापासून अभिनंदन!