१८ फेब्रुवारी २०२२ रोजी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. १९०० हुन अधिक शो मिळालेला पहिला मराठी चित्रपट म्हणून पावनखिंड या चित्रपटाने नाव नोंदवले आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चोख बजावली आहे. मृणाल कुलकर्णी यांनी साकारलेल्या जिजाऊ तितक्याच ताकदीच्या उभ्या केलेल्या पाहायला मिळाल्या. तर बाजीप्रभूंची मध्यवर्ती भूमिका अजय पुरकर यांनी त्यांच्या खांद्यावर सुरेख पेललेली पाहायला मिळते. प्राजक्ता माळी, क्षिती जोग, माधवी निमकर, समीर धर्माधिकारी, उज्वला जोग, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, अंकित मोहन यांनी देखील महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात साकारलेल्या पाहायला मिळतात.
उत्कृष्ट दिग्दर्शन आणि कलाकारांनी साकारलेला दमदार अभिनय यामुळे पावनखिंड चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०१६ साली नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत पहिल्याच विकेंड मध्ये ११.५ कोटींचा पल्ला गाठला होता. पावनखिंड या चित्रपटाला देखील प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. नियमामुळे अगदी ५० टक्के क्षमतेनेच चित्रपटगृह भरत असली तरी पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.१५ कोटींचा गल्ला या चित्रपटाने मिळवला आहे. शनिवारी शिवजयंती निमित्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहा बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावत तब्बल २.०८ कोटींचा गल्ला जमवून दिला आहे. काल रविवारी २.८० कोटी इतकी कमाई केलेली आहे.
त्यामुळे अवघ्या तीन दिवसातच पावनखिंड चित्रपटाने ६.०३ करोडोंचा गल्ला आपल्या खात्यात जमा केला आहे. तर आज सोमवारी हा चित्रपट जवळपास दीड कोटींचा पल्ला गाठणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपट बनवण्यासाठी जवळपास ८ कोटींचा खर्च लागला असल्याचे सांगितले जाते. यात चित्रपटाचे प्रमोशन आणि पोस्टर्सचा खर्च समाविष्ट करण्यात आला आहे. तीन दिवसात ६ कोटींचा गल्ला जमवणारा पावनखिंड चित्रपट पुढील दिवसांचे बुकिंग झाल्यामुळे हाऊसफुल्लचे बोर्ड लावताना दिसत आहे. सध्या मराठी चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्यास समर्थ ठरले आहेत. जयंती, पांडू, झिम्मा अशा चित्रपटांनी देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली पाहायला मिळाली. त्यामुळे मराठी चित्रपट आता हिंदी चित्रपटांना तगडी टक्कर देताना दिसत आहेत.