भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जयंती आज ४ फेब्रुवारी रोजी सर्वत्र साजरी केली जात आहे. पंडित भीमसेन जोशी हे शास्त्रीय गायक होते त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अभंग, भजन, ठुमरी, चित्रपट गीतं गायली होती. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी भीमसेन जोशी यांनी संगीत मैफिल घेतली होती. खरं तर लहानपणीच भीमसेन जोशी यांना संगीताची ओढ लागली. मात्र या क्षेत्रात येण्यासाठी त्यांच्या वडिलांचा स्पष्ट नकार होता. भीमसेन जोशी यांचे वडील शिक्षक होते. घरात एकूण चुलत भावंडे असे मिळून ते ६४ जणांपैकी एक होते म्हणून आपल्या मुलाने वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता.
पण मग वडिलांच्या इच्छे विरुद्ध त्यांनी पाऊल उचलले आणि घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भीमसेनजी केवळ ११ वर्षांचे होते. शास्त्रीय संगीतातील जी घराणी ख्यातनाम होती त्यातील ग्वाल्हेर, लखनऊ आणि रामपूर यापैकी एका ठिकाणी त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला. १९३३ साली ते ग्वाल्हेरला दाखल झाले. भीमसेन जोशी यांच्यावर अनेक ख्यातनाम शास्त्रीय गायकांचा प्रभाव होता. इनायत खाँ यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. काही वर्षे भीमसेन जोशी वेगवेगळ्या ख्यातनाम गायकांकडे शिकायला गेले याचवेळी त्यांचे वडील सतत त्यांचा शोध घेत राहिले. एके दिवशी भीमसेन जोशी यांचा सुगावा लागल्यावर त्यांचे वडील त्यांना घरी घेऊन आले. पुढे संगीत क्षेत्राचा ओढा पाहून सवाई गंधर्व रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले.
रामभाऊंनी त्यांना आपले शिष्य बनवले. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी पुण्यातील हीराबागेत भीमसेन जोशी यांची मैफिल रंगली होती. दरम्यान भीमसेन जोशी लोकप्रिय झाल्यावर अनेक ठिकाणी त्यांना बोलावण्यात आले. एकाच दिवशी दोन दोन शहरात त्यांचे कार्यक्रम होत असल्याने त्यांना अनेकदा विमानाने प्रवास करावा लागे. याचमुळे पू ल देशपांडे यांनी त्यांना गमतीगमतीत हवाई गंधर्व असे म्हटले होते. १९४४ साली भिमसेन जोशी यांनी मामाची मुलगी सुनंदा कट्टी यांच्याशी लग्न केले. राघवेंद्र, उषा, सुमंगल आणि आनंद ही चार अपत्ये त्यांना झाली. पुढे १९५१ मध्ये सहगायिका अभिनेत्री वत्सला मुधोळकर यांच्याशी दुसरा विवाह केला.जयंत, शुभदा आणि श्रीनिवास अशी तीन अपत्ये त्यांना झाली.
सुरुवातीला हे सगळे एकत्र राहत असत मात्र पुढे मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या पहिल्या पत्नीने मुलांसह पुण्यात राहण्याचा निर्णय घेतला. पंडित भीमसेन जोशी यांच्या मुलांनी देखील गायन क्षेत्रात नाव लौकिक केले. त्यांचा नातू विराज जोशी देखील आपल्या सुमधुर गायकीने रसिकांची भरभरून दाद मिळवतो आहे. विराज हा श्रीनिवास जोशी यांचा मुलगा. बालपणी आपल्या आजोबांची गाणी कानावर पडत असे तेव्हा त्याचा कल देखील याच क्षेत्राकडे असल्याचे पाहून त्यांना आनंद वाटायचा. आज वेगवेगळ्या मंचावर विराज आपल्या गाण्याने रसिकांना दाखल घ्यायला भाग पाडत आहे. त्याचे हे पाऊल भविष्यात त्याला उंच भरारी घ्यायला लावेल यात शंका नाही.