सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांचे कर्जत येथे एनडी स्टुडिओ आहे. या स्टुडिओमध्येच नितीन देसाई यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. वयाच्या ५८ व्या नितीन देसाई यांनी आपले आयुष्य संपवल्याने अनकांना मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई यांनी आत्महत्या केली हे समजताच स्टुडिओमध्ये असलेल्या कामगारांनी ही बातमी तातडीने नजीकच्या पोलिसांना कळवली होती. नितीन देसाई यांनी असे का केले याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी पोलीसांकडून या बाबतची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नितीन देसाई हे मराठी हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते तसेच कला दिग्दर्शक म्हणून काम करत होते. चित्रपटांसाठी भव्यदिव्य सेट उभारण्यात ते माहीर होते. बॉलिवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांसाठी त्यांनी कलादिग्दर्शक म्हणून काम केले. त्यांचे कर्जत येथील एनडी स्टुडिओ याचसाठी प्रसिद्ध होते. बॉलिवूड चित्रपटांचे बरेचसे शूटिंग एनडी स्टुडिओमध्ये पार पडले आहे. २००५ साली नितीन देसाई यांनी या स्टुडिओची उभारणी केली होती. तब्बल ४३ एकर परिसरात त्यांचे हे स्टुडिओ दिमाखात उभे होते. यामध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी त्यानी इथे उभारल्या होत्या. नितीन देसाई यांनी चित्रपटातून अभिनय देखील केला होता. बालगंधर्व आणि हम सब एक है चित्रपटातून ते पडद्यावर झळकले होते.
१९४२ अ लव्ह स्टोरी, परिंदा, विजेता, अकेले हम अकेले तुम, माचीस, आर या पार, ईश्क, करिब, आ गले लग जा अशा चित्रपटासाठी त्यांनी कलादिग्दर्शक म्हणून काम केले होते. नितीन देसाई यांचे नाव राजकीय क्षेत्रात देखील लौकिक होते. सर जे जे स्कुल ऑफ आर्टस् मधून त्यांनी कलेचे धडे गिरवले होते. सुरुवातीला फोटोग्राफी करण्यात त्यांना आवड होती त्यानंतर त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटातून एन्ट्री केली. प्रेम रतन धन पायो या चित्रपटासाठी काचेचा महाल उभारला होता. हा महाल बनवण्यासाठी काही कोटींचा खर्च करण्यात आला होता. असे भव्यदिव्य आणि आकर्षक सेट उभारण्यात नितीन देसाई माहीर होते. म्हणूनच बॉलिवूड चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून त्यांची मागणी वाढली होती. मराठी चित्रपटांसाठीही नितीन देसाई यांनी मोठे योगदान दिले होते. त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने अनेकांना खूप मोठा धक्का बसला आहे.