झी मराठी वाहिनीने टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता नवीन मालिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे दुपारी सुद्धा प्रेक्षकांना नवीन मालिकांचा आस्वाद घेता येणार आहे. या दोन्ही मालिकांचे प्रोमो नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्यांना प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली आहे. सध्या स्टार प्रवाह वाहिनी टीआरपीच्या बाबतीत पुढे आहे. या वाहिनीच्या बहुतेक मालिका टॉप दहाच्या यादीत स्थान मिळवत आहेत. त्यामुळे वाहिनीने दुपारी सुद्धा प्रेक्षकांचे मनोरंजन होण्यासाठी नवीन मालिका प्रसारित केल्या होत्या. आता हाच प्रयोग झी मराठी वाहिनीने सुद्धा आचरणात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून झी मराठी वाहिनीने सुद्धा कंबर कसत आपल्या वाहिनीचा टीआरपी वाढवा म्हणून नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. तू चाल पुढं, लोकमान्य, नवा गडी नवं राज्य मालिकांना मिळत असलेली पसंती पाहता वाहिनीने दुपारच्या वेळी सुद्धा नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. यात प्रामुख्याने श्यामची आई ही गोष्ट सर्वांना परिचयाची आहे. मात्र श्यामला संस्कारांचे धडे देणाऱ्या साने गुरुजींच्या यशोदा आईची गोष्ट जाणून घेण्यासाठी यशोदा ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. येत्या १३ फेब्रुवारी २०२३ पासून दुपारी १२.३० वाजता यशोदा मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे अशा वेगळ्या धाटणीच्या मालिकेचे स्वागत प्रेक्षकांनी केले आहे.
या मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार हे अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मालिकेची उत्सुकता वाहिनीने ताणून धरलेली आहे. एकीकडे यशोदा मालिकेतून ही संस्कारांची शिदोरी मिळतानाच, दुसरी कडे मात्र लवंगी मिरचीचा झटका सुद्धा प्रेक्षकांना लागणार आहे. कारण याच दिवशी सुपारी १ वाजता लवंगी मिरची ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत सर्वांची लाडकी शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर अस्मिची भूमिका साकारताना दिसणार आहे. लवंगी मिरची या मालिकेतून शिवानी पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीची नायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेतून शिवाणीने शितलीची भूमिका गाजवली होती.
आता या नव्या मालिकेतून तिच्या अभिनयाचा ठसका प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. शिवानी बावकर सोबत तिच्या बहिणीची भूमिका अभिनेत्री मिथिला पाटील साकारणार आहे. मिथिलाने या मालिकेअगोदर ज्ञानेश्वर माऊली मालिकेत मुकाबाईची भूमिका साकारली होती. आता लवंगी मिरची मालिकेतून ती सहाय्यक भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे या दोन्ही नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या ठरल्या आहेत. लवंगी मिरची या मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.