मालिकेत सहाय्यक तसेच विरोधी भूमिका साकारत असताना मुख्य नायिकेची भूमिका मिळणे हे खरं तर त्या कलाकारांसाठी मोठ्या भाग्याचं काम ठरते. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री नेहा जोशी हिला आला आहे. काही दिवसांपूर्वीच नेहाचे ओंकार कुलकर्णी सोबत लग्न झाले होते. कुठलाही गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने आणि मोजक्याच नातेवाईकांना आमंत्रित करून त्यांनी हे लग्न केलं होतं. सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे खास फोटो शेअर करून या दोघांनी ही आनंदाची बातमी जाहीर केली होती. लग्नानंतर काही दिवसातच नेहा मालिकेतून मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
अँड टीव्हीवर येत्या २० सप्टेंबर २०२२ पासून दुसरी माँ ही नवी हिंदी मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत नेहा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तर मोहीत दगा, आयुध भानुशाली नेहासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. एक महानायक मध्येही आयुधने नेहा सोबत काम केलेले आहे. नवीन मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. पतीच्या निधनानंतर पहिल्या बायकोच्या मुलाची जबाबदारी यशोदेवर येऊन पडते. मात्र सासरच्या मंडळींची मनधरणी करून ती आपला प्रवास कसा करणार याची ही कहाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या आधुनिक यशोदेचा प्रवास नेमका कसा असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. झी मराठीवरील का रे दुरावा या लोकप्रिय मालिकेत नेहाला रजनी पात्रामुळे प्रसिद्धी मिळाली.
पोश्टर बॉईज, नशीबवान, झेंडा, एक महानायक डॉ बाबासाहेब आंबेडकर, मिडीयम स्पायसी, अवघाचि संसार. तसेच ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, फर्जंद, आठशे खिडक्या नऊशे दार, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, सुंदर माझं घर. या मराठी चित्रपटातून आणि मालिकांमधून नेहाने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. मराठी सृष्टीतील एक सशक्त नायिका अशीही तिची ओळख आहे. ही सकारात्मक भूमिका नेहा आपल्या सहजसुंदर अभिनयाने चांगली वठवणार याचा विश्वास आहे. दृश्यम २, हवा हवाई अशा हिंदी चित्रपटाचा ती एक भाग बनली आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच नेहाने आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धेतून सहभाग दर्शवला होता. क्षण एक पुरे या व्यावसायिक नाटकामुळे नेहा प्रकाशझोतात आली. ऊन पाऊस या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.