ज्येष्ठ अभिनेत्री निना कुलकर्णी या गेल्या अनेक दशकापासून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. रंगभूमीपासून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती. या प्रवासात स्वराज्य जननी जिजामाता, हाच सुनबाईचा भाऊ, सवत माझी लाडकी, शेवरी, नितळ, उत्तरायण, दाग द फायर, ढाई अक्षर प्रेम के. नायक, बादल, फिर भी दिल है हिंदुस्थानी, पहेली अशा अनेक हिंदी मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. दिवंगत अभिनेते दिलीप कुलकर्णी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या. एक शिस्तबद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अशी त्यांनी ओळख मिळवली होती.
एका घरात होती या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पाऊल टाकलं. चौकट राजा, परिंदा, अफलातून, घरोघरी, रात्र आरंभ अशा अनेक हिंदी मराठी चित्रपट, नाटक तसेच मालिकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आपलं बुवा असं आहे मधील त्यांची भूमिका खूपच गाजली होती. दिलीप कुलकर्णी यांच्यासोबतचे काही फोटो नीना कुलकर्णी यांनी शेअर केले आहेत. ‘ब्लॅक अँड व्हाइट’ जमान्यातील बहुरंगी दिवस असे कॅप्शन त्यांनी या आठवणींना उजाळा देताना दिले आहे. दिलीप कुलकर्णी यांचे २२ डिसेंबर २००२ रोजी निधन झाले. त्यांच्यासोबतच्या नाटक आणि चित्रपट मधील आठवणी जाग्या करताना नीना कुलकर्णी खूपच भावुक झाल्या आहेत. २५ ऑक्टोबर १९८० रोजी या दोघांचा विवाह झाला होता.
आज लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेले पाहायला मिळत आहेत. दिलीप कुलकर्णी यांच्या निधनानंतर दिविज आणि सोहाचा सांभाळ नीना कुलकर्णी यांनी समर्थपणे पेलला. आज त्यांची ही दोन्ही मुलं चंदेरी दुनियेत कार्यरत आहेत. दिविज दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत असून त्याने काही जाहिरातींचे दिग्दर्शन केले आहे. तर त्यांची धाकटी लेक सोहा कुलकर्णी ही सोनी मराठी वाहिनीची व्हाईस प्रेसिडेंट आहे. तसेच क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून ती जबाबदारी सांभाळताना दिसते. सोहाला प्राण्यांची देखील विशेष आवड आहे, कुत्री, मांजर आणि पोपट असे प्राणी, पक्षी तीने पाळलेले आहेत. पाळीव प्राणी आक्रमक झाल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने हाताळायचं, या प्रश्नांचे सोल्युशन सोहा अनेक पालकांना देत असते.