आज २९ एप्रिल रोजी अभिनेते मोहन गोखले यांचा स्मृतिदिन आहे. मोहन गोखले यांना लहानपणापासूनच रंगभूमीची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी राज्यस्तरावर उत्कृष्ट अभिनयाचे अनेक पुरस्कार पटकावले होते. त्यांनी पुणे येथे थिएटर अकादमीची स्थापना देखील केली होती. नाना पाटेकर यांचे पहिले मराठी नाटक भाऊ मुरारराव हे मोहन गोखले यांनी दिग्दर्शित केले होते. विजय तेंडुलकर यांनी हे नाटक लिहिले होते. गोखले यांची रंगभूमीवरील कारकीर्द रवींद्र मंकणी दिग्दर्शित फरारी या चित्रपटापासून सुरू झाली होती. कस्तुरीमृग हे त्यांचे अभिनित केलेले पहिले नाटक.

मोहन गोखले यांनी ठकास महाठक या चित्रपटात स्त्री व्यक्तिरेखा साकारली होती. हेच माझे माहेर आणि मिर्च मसाला यासह मराठी आणि हिंदीतील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. भारत एक खोज मध्येही त्यांनी भूमिका केली होती. दूरदर्शनवरील मिस्टर योगी मधील भूमिकेतून ते लोकप्रिय झाले होते. २९ एप्रिल १९९९ रोजी चेन्नई येथे कमल हसनच्या हे रामचे शूटिंग करत असताना, वयाच्या ४५ व्या वर्षी गोखले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अमोल पालेकर यांचा कैरी हा शेवटचा चित्रपट ठरला होता. शुभांगी गोखले या मोहन गोखले यांच्या पत्नी. आज मोहन गोखले यांना जाऊन २४ वर्षे लोटली आहेत. त्यांच्या स्मृतिदिनी शुभांगी गोखले यांनी भावुक गोष्ट लिहिली आहे.

मोहन गोखले यांच्या आठवणीत रमताना शुभांगी गोखले म्हणतात की, आठवणींचं बरं असतं, येतजात तरी रहातात. आज तर मुक्कामाला आहेत, लक्ष असू दे मोहन, वर्ष चोविसावे. असे म्हणत त्यांनी एकत्रित काम केल्याचा एका सिनचा फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांचे डायलॉग होते की, ‘दोन दिवस दिसला नाहीस! ठीक आहेस ना?’ असे संवाद असलेला स्क्रीन शॉट त्यांनी पोस्ट केलेला पाहून सेलिब्रिटींनी देखील भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. शुभांगी गोखले यांचा जन्म खामगावचा त्या पूर्वाश्रमीच्या शुभांगी संगवई. त्यांचे वडील जिल्हा न्यायाधीश होते तर आई गृहिणी. वडिलांच्या नोकरीमुळे कुटुंबाने अनेक वेळा स्थलांतर केले. जालना, मलखापूर, बुलढाणा आणि महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे वास्तव्य झाले.
औरंगाबादला शासकीय महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी एका नाटकात भाग घेतला होता. अभिनेत्री असण्यासोबतच त्या एक लेखिका देखील आहेत, अनेक लघुकथा आणि लेख त्यांनी लिहिले आहेत. मोहन गोखले यांच्या निधनानंतर शुभांगी गोखले यांनी अभिनय क्षेत्रातून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. पुन्हा या क्षेत्रात परतल्यानंतर श्रीयुत गंगाधर टिपरे मधील श्यामलाच्या भूमिकेने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. मोहन गोखले यांचे निधन झाले त्यावेळी सखी खूप लहान होती. गेल्या वर्षी सखीने वडिलांच्या आठवणीत रमणारी एक पोस्ट लिहिली होती. आज मोहन गोखले यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली.