कलाक्षेत्रात स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी अनेक कलाकारांनी खस्ता खाल्ल्या आहेत. अशातच प्रसिद्ध गायक पंडित वसंतराव देशपांडे यांचं आयुष्य देखील एका वादळापेक्षा काही कमी नव्हतं. गाणं गाण्याच्या नावाखाली जे काही गलिच्छ, अभद्र तुम्ही ऐकवलंत त्याला आम्ही समाज मान्यता देणार नाही अशीही अवहेलना केली जात होती. समोर उभे असलेले अनेक अडथळे पार करत या कलाकाराने दिग्गजांच्या पंगतीत स्वतःचे स्थान निर्माण केले. ‘देशपांडे’ माझं घराणं माझ्यापासूनच सुरू होतं, हे वसंतरावांनी स्वतःच्या कलेवर ठाम विश्वास ठेवत जगासमोर सिद्ध केलं. त्यांच्या याच खडतर जीवनाचा प्रवास मी वसंतराव या चित्रपटातून उलगडताना दिसणार आहे.
रंगतदार सुरांची मैफिल सजावणाऱ्या अवलियाचा हा चित्रपट येत्या १ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. वसंतराव देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका त्यांचाच नातू राहुल देशपांडे यांनी साकारली आहे. तर पुष्कर चिरपुटकर पु ल देशपांडे यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अमेय वाघ, अनिता दाते, कौमुदी वालोकर, सारंग साठ्ये या कलाकारांची साथ मिळाली आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्यातील संघर्षमय वास्तव यातून पाहायला मिळणार आहे. बहरलेली वसंताची गायिकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नव्हे, दऱ्याखोऱ्यातून बेफाम दौडत जाणाऱ्या घोडेस्वार सारखी आहे. भर उन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी.
ती फुले पहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी. पु ल देशपांडे यांचे हे उद्गार वसंतरावांच्या सुमधुर गायकीबद्दल सर्व काही सांगून जातात. वसंतराव हे शास्त्रीय संगीत शैलीतील प्रसिद्ध गायक तसेच मराठी संगीत रंगभूमीवरील नावाजलेले अभिनेते. गायकीवर तसेच तबला आणि हार्मोनिअम या वाद्यांवर त्यांचा हातखंडा होता. त्यांनी शास्त्रीय संगीतात जबरदस्त गायकीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्यांत मानाचे स्थान निर्माण केले. आपल्या गायकीनं रसिकांच्या हृदयावर आपले नाव कायमचे कोरले. वसंतरावांनी कारकिर्दीच्या सुरवातीची दोन दशके नोकरी करीत संगीताची उपासना सुरु ठेवली. गुळाचा गणपती, अष्टविनायक, पेडगावचे शहाणे, अवघाची संसार, दूधभात यासारख्या शेकडो चित्रपटांसाठी पार्श्वगायन सोबत अभिनय देखील साकारला.
चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर यांची निर्मिती असलेला हा चित्रपट निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केला आहे. संगीत दिग्दर्शक म्हणून ‘मी वसंतराव’ हा राहुल देशपांडे यांचा पहिला चित्रपट ठरणार आहे. याविषयी राहुल देशपांडे म्हणतात, यातील सर्वच गाणी मी तुम्हाला ऐकवायला आतूर आहे. पण माझ्या या नव्या प्रवासाची सुरुवात घेई छंद या गाण्यापासून होते आहे, ज्याने महाराष्ट्रातील प्रत्येक संगीत प्रेक्षकाला वेड लावलं. हेच गाणं जे आजही इतक्या वर्षांनंतर तेवढंच लोकप्रिय आहे. आणि हेच ते गाणं ज्याने पंडित वसंतराव देशपांडे हे नाव घराघरांत पोचवलं. त्यांच्या गाण्यासारखंच वादळी आयुष्य जगणाऱ्या एका मनस्वी कलाकाराचा जीवनपट नक्की अनुभवा.