महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी म्हणजेच माता रमाबाई आंबेडकर यांचा इतिहास आजवर अनेक चित्रपट, मालिका तसेच नाटकातून पाहायला मिळाला. पण या बहुतेक प्रोजेक्टमधून त्यांना दुःखी, कष्टी, शेण काढणारी, गौऱ्या थापणारी रमाई दाखवली आहे. खरं तर रमाईंच्या भक्कम पाठिंब्याची साथ मिळल्यानेच डॉ बाबासाहेब विदेशात जाऊन आपले शिक्षण घेत होते. आपल्या पतीला विदेशात मनिऑर्डर करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. रमाई लढवय्या, धाडसी होत्या मुंबईच्या जे जे हॉस्पिटलसमोर त्यांनी एक सभा घेतली होती. त्या सभेची दखल त्या काळच्या वृत्त माध्यमातून घेतली गेली.
उत्तम वक्त्या म्हणूनही रमाईंचे अनेक दाखले, पुरावे वेगवेगळ्या संग्रहात तुम्हाला आढळतील. माता रमाईंच्या याच धाडसी वृत्तीचा इतिहास चित्रपटातून दाखवण्यात यावा म्हणून अभिनेत्री प्रियांका उबाळे हिने धडपड केली. मात्र हा चित्रपट बनवण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रियांका उबाळे हि मूळची परभणीची. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातून तिने आपले शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर तिने मुंबई गाठली. बाबो, प्रेमवारी, माझ्या नवऱ्याची बायको, साता जल्माच्या गाठी अशा मालिका चित्रपटातून तिला भूमिका मिळत गेल्या. मात्र माता रमाईंचा प्रभाव बालमनावर रुजल्याने त्यांचा इतिहास जागतिक पातळीवर आणायचा या जिद्दीने तिला झपाटून सोडले होते.
दरम्यान चित्रपट बनवायचा असेल तर त्यासाठी पैसा पाहिजे मात्र मित्रांच्या मदतीने तिने हे धाडस पेलण्याचे ठरवले. मी रमाई हा एकपात्री चित्रपट बनवण्यासाठी तिने माता रमाईंचा अभ्यास केला. विविध संग्रहातून माहिती मिळवली, स्क्रिप्ट लिहून काढले. मात्र आता वेळ होती चित्रपटाला स्पॉन्सर कोण करणार याची. चित्रपट अनेक निर्मात्यांना आवडला मात्र पुरेसे पैसे नसल्याने किंवा यात प्रॉफिट नसल्याचे पाहून अनेकांकडून नकार मिळाला. मग स्वतःच चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन, निर्मिती आणि अभिनय करायचे ठरवले. बहिणीच्या मदतीने काही पैसे जमवले. फोटोग्राफर असलेला मित्र प्रकाश वाघला २०० डी कमेऱ्यावर चित्रपट शूट करण्यास सांगितले. चित्रपट पूर्ण झाला, मात्र तो दाखवायचा कुठे हा प्रश्न तिच्यासमोर होता.
कारण त्यासाठी लागणारे पैसे तिच्याकडे नव्हते. शेवटी गावागावात जाऊन प्रोजेक्टरवर तिने चित्रपट मोफत दाखवण्याचे ठरवले. खेड्यापाड्यातील महिलांना रमाईचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्याने त्यांना आनंद झाला. पण हा चित्रपट तिला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचा आहे. परंतु आर्थिक पाठबळ शिवाय ते अशक्य आहे. चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर तुमच्या खिशात लाखो करोडो रुपये असायला हवेत. प्रियांकाने चित्रपटासाठी हातभार लागावा म्हणून मदतीचे आवाहन केले आहे. तिच्या या आवाहनाला आता प्रतिसाद मिळू लागला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मेजर साहेबांनी २५ हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. त्यामुळे प्रियांकाने पाहिलेलं स्वप्न आता लवकरच पूर्णत्वास येईल अशी तिला आशा आहे.