भैरू पैलवान की जय, गनिमी कावा, फटाकडी ,युगपुरुष, नवरा माझा ब्रह्मचारी, आपलेच दात आपलेच ओठ, आयत्या बिळावर नागोबा या चित्रपटातून दमदार नायकाची भूमिका साकारली ती याशवंत दत्त यांनी. त्यांचे मूळ नाव होते यशवंत दत्तात्रय महाडिक. पुण्यातील सदाशिव पेठेत त्यांचे कुटुंब वास्तव्यास होते. वडील दत्तात्रय महाडिक हे निर्मिती क्षेत्रात कार्यरत होते. त्यामुळे नाटक सिनेमाचे वातावरण त्यांनी लहानपणापासूनच अनुभवले होते. यशवंत दत्त हे नकला करण्यात पटाईत होते. शाळेत असताना वर्गशिक्षकांच्या नकला करत असताना कित्येकदा त्यांना शाळेबाहेर उभे राहावे लागत असे.
त्यांच्या वडिलांनी गरिबांचे राज्य या चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र या चित्रपटामुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. हे नुकसान एवढे होते की त्यांच्या कुटुंबाला दोन वेळचे जेवण महाग झाले होते. मग घर चालवायचे म्हणून हॉटेलमध्ये वेटरचे काम, पानपट्टीच्या दुकानात काम केले. पुढे फिलिप्स कंपनीत त्यांना नोकरी लागली आणि आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. नाट्य क्षेत्रातील अनेक मंडळींशी भेट घडून आली. राज्यनाट्य स्पर्धेत ‘अडीच घर वजीराला’ या नाटकाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. वेडा वृंदावन, नाथ हा माझा, वादळ माणसाळतय या नाटकामुळे यशवंत दत्त लोकप्रिय झाले होते. सरकारनामा, सुगंधी कट्टा या चित्रपटातून त्यांनी खलनायक देखील रंगवला होता.
शापित आणि संसार या चित्रपटासाठी त्यांना राज्यशासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ११ नोव्हेंबर १९९७ रोजी वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षीच यशवंत दत्त यांनी जगाचा निरोप घेतला. यशवंत दत्त यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय कलेचा वारसा पुढे चालवताना दिसत आहेत. त्यांचा मुलगा अक्षय यशवंत दत्त महाडिक हे मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत. सुरुवातीला नाटकांमधून अभिनय करत असलेल्या अक्षयने पुढे दिग्दर्शन क्षेत्राकडे आपली पावले वळवली. अभिनय क्षेत्रात न येण्याचे कारण त्यानेच सांगितले होते की, मी जर अभिनय क्षेत्रात आलो, तर माझी तुलना माझ्या वडिलांशी केली जाईल त्यामुळे मी दिग्दर्शनाकडे वळलो. माझे वडील ज्यावेळी चित्रपटातून लोकप्रिय झाले त्यावेळी मी खूपच लहान होतो.
परंतु ज्यावेळेस मी त्यांचे काम बघायचो त्यावेळी स्वतःला खूप नशीबवान समजायचो, दुर्दैवाने मला त्यांचा खूप कमी सहवास लाभला. एक वेगळा विषय घेऊन त्याने धागेदोरे, आरंभ, ७ रोशन व्हीला यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. अक्षयची पत्नी ‘वेदांती भागवत महाडिक’ ही कथक नृत्यांगना आहे. Layom institute of Art’s and Media नावाने तिची पुणे, कोथरूड येथे नृत्य संस्था आहे. विविध कार्यक्रमाच्या मंचावरून तिने आपल्या नृत्याची अदाकारी दाखवून दिली आहे. अक्षय आणि वेदांती यांना ‘ओवी’ ही एकुलती एक कन्या आहे. ओवी देखील आपल्या आईकडून नृत्याचे धडे गिरवत आहे. ७ रोशन व्हीला या अक्षयच्या चित्रपटासाठी वेदांतीने कोरिओग्राफर म्हणून काम केले होते.