प्रेमविवाह ही कल्पना आता सर्वसामान्यांनी देखील स्वीकारण्यास सुरुवात केलेली आहे. बॉलिवूड चित्रपटातून अशा गोष्टी आपल्या मनावर रुजत गेल्या. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटात सुद्धा अशा कथानकांना उत येऊ लागला होता. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रेमविवाह करून एक नवा पायंडा प्रेक्षकांच्या मनात बिंबवला होता. अनेक कलाकारांनी त्या काळात आपल्याच सहकलाकारासोबत लग्नाची गाठ बांधलेली होती. बॉलिवूड सृष्टीला त्यामुळे ह्या गोष्टी काही नवीन नव्हत्या. मात्र मराठी चित्रपट सृष्टीत त्या काळी अशा गोष्टी खूप कमी दिसत. असे बरीचशी कलाकार मंडळी लग्न झाल्यानंतर चित्रपटातून काढता पाय घेत असत.
व्ही शांताराम, रमेश देव अशा मराठी सृष्टीतील नामवंत कलाकारांनी प्रेम विवाह केला होता. मात्र त्याअगोदर दादा साळवी यांनी मराठी सृष्टीतला पहिला प्रेम विवाह म्हणून आपल्या नावावर शिक्कामोर्तब केलेला होता हे खूप कमी लोकांना माहीत आहे. दादा साळवी म्हणजेच दिनकर शिवराम साळवी होय. रत्नागिरी जिल्ह्यातील फणसोप गावी ४ डिसेंबर १९०४ रोजी त्यांचा जन्म झाला. जेमतेम शाळेतील शिक्षण करून त्यांनी पोलीस खात्याची नोकरी स्वीकारली. याचदरम्यान दादा साळवी गणपती उत्सवात नाटकातून काम करत असत. नाटककार टिपणीस यांनी त्यांचे काम पाहिले आणि मुंबईला घेऊन आले. १९२८ सालच्या खून ए नाहक मुकपटातून दादा साळवी पहिल्यांदा झळकले होते. याचदरम्यान इम्पिरियल फिल्म कंपनीने त्यांना चित्रपटातून काम मिळवून दिले.
भोला शिकार, सिनेमा घर, रात की बात अशा मुकपटातून त्यांना अभिनयाची संधी मिळत गेली. याचदरम्यान अभिनेत्री सखूबाईंशी प्रेमविवाह केला होता. हिंदी चित्रपट सृष्टीत प्रेमविवाह गौण मानला जात असे. मात्र मराठी सृष्टीतील पहिला प्रेमविवाह म्हणून दादा साळवी आणि सखूबाईंचे लग्न खूप गाजले होते. अगदी चित्रपटातील प्रमुख भूमिका ते नायिकेचे वडील अशी त्यांची कारकिर्द खूपच उल्लेखनीय ठरली होती. पाटील, सावकार, प्रेमळ वडील, खलनायक अशा भूमिकेतून ते सहजतेने वावरत असत. कन्यादान, कुलदैवत, देवता, शिकलेली बायको, गणानं घुंगरू हरवलं, वरदक्षिणा, सुखी संसार. कधी करिशी लग्न माझे, सांगत्ये ऐका, एक गाव बारा भानगडी अशा चित्रपटातून पाच दशकं अभिनय क्षेत्रात स्वतःला झोकून दिले होते. २९ ऑक्टोबर १९८० रोजी दादा साळवी यांनी अखेरचा श्वास घेतला.