आज २६ ऑगस्ट ज्येष्ठ अभिनेत्री मनोरमा वागळे यांचा स्मृतिदिन. मनोरमा वागळे या मराठी, हिंदी चित्रपट, नाट्य तसेच मालिका अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात होत्या. गंमत जंमत, घर जावई, राजाने वाजवला बाजा, सगळीकडे बोंबाबोंब अशा चित्रपटातून त्यांनी खाष्ट कजाग सहाय्यक भूमिका तर कधी विनोदी ढंगाच्या भूमिका साकारल्या होत्या. मनोरमा वागळे या पूर्वाश्रमीच्या सुमती तेलंग. लहानपणापासूनच त्या आर एन पराडकर यांच्याकडे नाट्य संगीताचे धडे गिरवत असत. गोवा हिंदू असोसिएशनच्या महिला विभागातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले.
गाण्याची आवड असल्याने सहाजिकच त्यांनी संगीत नाटकातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली. यातूनच पुढे चित्रपटातून त्यांना अभिनयाची संधी मिळत गेली. संगीत नाट्य समीक्षक मनोहर वागळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि सुमती तेलंगच्या त्या मनोरमा वागळे झाल्या. सगळीकडे बोंबाबोंब चित्रपटा मधील खाष्ट पण विनोदी बाज असलेली त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ९० च्या दशकातील गोट्या या मालिकेत सुद्धा त्यांनी खाष्ट सासूची भूमिका साकारली होती. आगे की सोच सारख्या काही मोजक्या हिंदी चित्रपटातही त्यांना अभिनयाची संधी उपलब्ध झाली होती. पडद्यावर त्यांनी विरोधी भूमिका जरी साकारल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात त्या अतिशय प्रेमळ आणि मिश्किल स्वभावाच्या होत्या.
सहकलाकारांची विचारपूस करणे, सुगरण असल्याने स्वतःच्या हातचं सर्वांना खाऊ घालणे या गोष्टी त्यांना करायला खूप आवडत असत. मनोहर आणि मनोरमा वागळे यांना तीन मुली. त्यापैकी मुलगी मेधा जांबोटकर यांनी आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात येण्याचे ठरवले. मेधा जांबोटकर यांनी हिंदी मालिकांमधून आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. ये रिश्ते है प्यार के, ये रीश्ता क्या केहलाता है अशा मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारल्यानंतर त्या मराठी सृष्टीकडे वळल्या. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतून त्या अरुंधतीचया आईच्या भूमिकेत झळकल्या. त्यांच्या नावाने एक युट्युब चॅनल आहे. चाकोरी बाहेरील चारचौघी या सेगमेंट मधून त्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची मुलाखत घेत असतात. त्यांच्या या उपक्रमाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.