मन झालं बाजींद या मालिकेत नवनवीन घडामोडी पहायला मिळत आहेत. राया आणि कृष्णाला घरातून बाहेर काढलं असून त्यांनी पडवीमध्ये आपला संसार थाटताना दिसत आहेत. इकडे हळदीच्या कारखान्यात रायाचे लक्ष्य नसल्याने विधाते कुटुंबाला नुकसान सोसावे लागत आहे. हे नुकसान होऊ नये म्हणून राया आणि कृष्णा कारखान्यात जाणार असल्याचे ठरवतात. आपल्या नातसुनेने कारखान्यात जाऊन काम करणे दादासाहेबांना मुळीच पसंत नाही त्यामुळे कृष्णाचे कारखान्यात जाणे दादासाहेबांना त्रासदायक ठरत आहे. ‘तुम्ही कृष्णाला सून मानत नाहीत मग तिला काही बोलण्याचा हक्क तुम्ही गमावला आहे.’ असे राया दादासाहेबांना सांगतो आणि कृष्णाला घेऊन तो कारखान्यात जातो.
दादासाहेब कृष्णावर नाराज असल्याने गुलीच्या सांगण्यावरून अंतरा पूजेची तयारी करते. ते पाहून दादासाहेब आम्हाला अशीच सून हवी म्हणत अंतरावर खुश होतात. मालिका अधिक रंजक व्हावी या हेतूने काही दिवसांपूर्वीच दादासाहेब विधातेंची एन्ट्री करण्यात आली होती. दादासाहेबांच्या शब्दाला कोणीच मान देत नाही त्यामुळे दादासाहेब सगळ्यांवर चिडून असतात. ही भूमिका साकारली आहे ज्येष्ठ अभिनेते विकास हांडे यांनी. विकास हांडे हे अभिनेते, दिग्दर्शक, कवी, डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळखले जातात. मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटात तसेच मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विकास हे मूळचे पुण्याचे, मात्र कामानिमित्त ते मुंबईत स्थायिक झाले आहेत.
उत्तम कवी असण्यासोबतच विकास उत्तम दिग्दर्शन देखील करत आहेत. गेल्या काही दशकांपासून ते अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. कॉलेजमध्ये असल्यापासूनच विकास हांडे यांनी विविध नाट्यस्पर्धामधून अभिनय साकारला होता. चिऊ ताई चिऊ ताई दार उघड या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन तसेच अभिनय साकारला होता. पुगल्या या त्यांनी अभिनित केलेल्या मराठी चित्रपटाला मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये नावाजले होते. इनसाईड एज ३, कामना, व्हीसल ब्लोअर अशा हिंदी मालिका, चित्रपट तसेच वेबसिरीज त्यांनी साकारल्या. सोबत कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ, झी मराठी वरील अल्टी पल्टी सुमडीत कल्टी या मालिकेतून ते सहाय्यक भूमिकेत पाहायला मिळाले.
समांतर, फोटो प्रेम, पाऊस या मराठी चित्रपटातून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. अल्टी पल्टी मालिकेनंतर विकास हांडे पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर झळकताना दिसत आहेत. दादासाहेब विधाते ही अभिनयाची कारकिर्द अधोरेखित करणारी महत्वाची भूमिका त्यांच्या वाट्याला आली आहे. दादासाहेबांच्या येण्याने मन झालं बाजींद मालिकेला नवे वळण मिळाले. लवकरच गुली मावशी आणि अंतराचे कटकारस्थान त्यांच्या समोर येणार आहे. ही मालिका पुढच्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे ही मालिका आटोपती घेण्यावर अधिक भर दिला जात आहे.