झी मराठी वाहिनीवरील “मन उडू उडू झालं” ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत दिपीका लवकरच इंद्राला प्रेमाची कबुली देणार आहे. मात्र त्यागोदरच दीपिका ही मनोहर देशपांडे सरांची मुलगी असल्याचे सत्तूला समजते. हे सांगण्यासाठी सत्तू इंद्राकडे जात असताना त्याचा ऍक्सिडंट होतो. इंद्रा सत्तूला घेऊन दवाखान्यात जातो. तर तिकडे दीपिका इंद्राला होकार देण्यासाठी त्याची वाट पाहत असते. दीपिका देशपांडे सरांची मुलगी आहे असे समजल्यावर इंद्रा दिपूला नकार देणार का? हे येत्या काही भागातच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण त्याअगोदर या मालिकेत एक असे पात्र आहे, जे फारसे मालिकेतून दाखवले जात नाही. हे पात्र आहे इंद्राच्या आईला घरकामात मदत करणारे “बाबू काका”.
मालिकेत बाबू काकांच्या पात्राला पुरेसा वाव मिळाला नसला तरी आजवर त्यांनी अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारून प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. आज बाबू काकांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते “अरुण होर्णेकर” यांच्याबद्दल जाणून घेऊयात.अरुण होर्णेकर यांनी गेल्या ४५ वर्षाहून अधिक काळापासून रंगभूमीची निष्ठेने सेवा केली आहे. नाटक, चित्रपट तसेच मालिका आशा तिन्ही क्षेत्रात हरहुन्नरी अभिनेते म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. नाट्यसृष्टीत त्यांनी लेखक आणि दिग्दर्शकाचीही भूमिका अगदी चोख बजावली आहे. महाविद्यालयिन एकांकिका स्पर्धांमधून त्यांनी रंगभूमीवर नवनवीन प्रयोग केले आहेत. सुरुवातीला कमर्शियल आर्टचं काम करणारे अरुण होर्णेकर यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले ते ओघानेच. एकदा सहज म्हणून ते साहित्य संघातील अमृत नाट्यभारतीच्या शिबिरात मित्राला प्रवेश घ्यायला गेले होते.
तिथे त्यांनीही प्रवेशासाठी अर्ज भरला होता. ज्या मित्राला प्रवेश घ्यायचा होता त्याला प्रवेश मिळाला नाही. मात्र अरुण होर्णेकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना विचित्र उत्तरं दिली. आणि कमलाकर सोनटक्के यांनी त्यांना लगेचच प्रवेश देऊ केला. वेटिंग फॉर गोदो, भोगसम्राट, हैदोस, एक शून्य बाजीराव, कभी पास कभी फेल, नकुशी, विच्छा माझी पुरी करा, षडयंत्र, सख्खे शेजारी, गिधाडे. तसेच अडोस पडोस, रात्रीस खेळ चाले, नशिबाची ऐशी तैशी, पक पक पकाक, सखाराम बाईंडर अशा चित्रपट मालिका आणि नाटकांमधून त्यांनी अभिनय साकारला आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील नकुशी या लोकप्रिय मालिकेत अरुण होर्णेकर यांनी छबुकाकांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती.
विशेष म्हणजे मालिकेतील भूमिकेमुळे याच नावाने त्यांना ओळखलेही जात होते. रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत त्यांनी पोस्टमन काकांची भूमिका साकारली होती. तर नांदा सौख्यभरे या मालिकेत वच्छि आत्याच्या नवऱ्याची भूमिका निभावली होती. सध्या झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत ते बाबू काकांची भूमिका साकारत आहेत. नुकतेच १६ डिसेंबर २०२१ रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतिदिनी विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अरुण होर्णेकर यांना ‘लक्ष्मीकांत बेर्डे नाट्यव्रत पुरस्काराने’ गौरविण्यात आले. अशा या हरहुन्नरी कलाकाराला आमच्या कलाकार इन्फोच्या टीम तर्फे सलाम आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.