महेश कोठारे यांची आई “जेनमा उर्फ सरोज अंबर कोठारे” यांचे १५ जुलै २०२३ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. जेनमा कोठारे या ९३ वर्षांच्या होत्या. महेश कोठारे यांना मातृशोक झाल्याने त्यांचे कुटुंबीय सध्या दुखाच्या छायेखाली वावरत आहे. ह्याच वर्षी म्हणजे २१ जानेवारी रोजी महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे निधन झाले होते. एकापाठोपाठ आलेली ही दुःख पचवण्याचे त्यांना बळ मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहे. महेश कोठारे यांच्या आई या सुद्धा अभिनेत्री होत्या. विविध नाटकातून त्यांनी काम केलेले होते.
तर वडील अंबर कोठारे हे देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. जेनमा फिल्म्स हे आईच्या नावाने त्यांनी स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली होती. या निर्मिती संस्थेतून महेश कोठारे यांनी अनेक दर्जेदार कलाकृती घडवल्या आहेत. २०२० साली उर्मिलाने आजे सासू जेनमा यांचा ९० वा वाढदिवस खास अंदाजात साजरा केला होता. त्यावेळी कोठारे कुटुंबाचा एकत्रित फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला होता. मराठी सृष्टीतील चार पिढ्या एकत्र पाहून सर्वांनी त्यांच्या कुटुंबियांच मोठं कौतुक केलं होतं. अंबर कोठारे यांच्या निधनानंतर जेनमा कोठारे यासुद्धा वृद्धापकाळाने खचून गेल्या होत्या. मात्र महेश कोठारे आणि त्यांची पत्नी, आदीनाथ कोठारे हे त्यांची व्यवस्थित काळजी घेत होते. आजोबा आपले मित्रच होते असे आदिनाथ वारंवार सांगत असे.
आजोबांच्या निधनानंतर आता आजीच्या निधनाने आदिनाथ सुद्धा खूप भावुक झाला आहे. जेनमा कोठारे यांना वृद्धापकाळामुळे जास्त हालचाल करता येत नव्हती. मात्र असे असले तरी मुलगा आणि नातवाने त्यांची विशेष काळजी घेतली होती. संपूर्ण कुटुंब आई वडिलांची सेवा करण्यात व्यस्त असे. म्हणूनच जेनमा कोठारे आणि अंबर कोठारे दीर्घायुष्य जगू शकले होते. महेश कोठारे यांच्या कारकीर्दित अभिनय क्षेत्र असो व निर्मिती त्यात त्यांना अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. त्यात आई वडिलांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि मोलाची साथ महेशजींना मिळाली होती. जेनमा उर्फ सरोज कोठारे यांच्या मृतात्म्यास शांती मिळो आणि कोठारे कुटुंबियाला या दुःखातून सावरण्यास बळ मिळो हीच एक सदिच्छा.