स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या जन्मदिवस निमित्त त्यांच्या आठवणीत अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केलेल्या पाहायला मिळाल्या. अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील लता दिदींच्या आठवणी जाग्या करत त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. खरं तर हेमांगी कवीच नव्हे तर देशभरात लता दिदींच्या गाण्याचे करोडो चाहते आहेत. त्यांच्या गाण्यांचा एक अनमोल ठेवा त्यांनी या सर्वांना वाटून दिलेला आहे. लता दिदींचे अगोदरचे नाव हेमा होते हे हेमांगीच्या लक्षात आले. आपल्या नावाशी मिळतेजुळते नाव असल्याने हेमांगीला आनंद झाला आहे. लता दिदींचे निधन झाले होते त्यावेळी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हेमांगी कवीने शिवाजी पार्कला हजेरी लावली होती.
कडक बंदोबस्तामुळे तिला पोलिसांनी आत सोडले नव्हते. हेमांगीच नाही मोठमोठाले सेलिब्रिटी, राजकारणी वगळता कुठल्याही व्यक्तीला आत जाण्यास मनाई करण्यात आली होती. परंतु एका पोलिसाला विनंती केल्यावर हेमांगीला आतमध्ये सोडण्यात आले होते. तेव्हा हेमांगीने लता दिदींच्या पायाजवळ वाहिलेली सोनचाफ्याची फुले तिने घरी आणली होती. दिदींचा हा मोठा आशीर्वाद आहे असे म्हणत तिने या फुलांच्या पाकळ्या आपल्याकडे कायम जपून ठेवल्या आहेत. ही बाब सोशल मीडियावर उघड केल्यावर चाहत्यांनी तिचं मोठं कौतुक केलं होतं. हेमांगी सोशल मीडियावर नेहमी आपल्या भावना व्यक्त करत आली. यावरून तिला अनेकदा ट्रोलही करण्यात आलेलं आहे मात्र तिचा हा हजरजबाबीपणा प्रेक्षकांना खूपच भावला.
आज लता दिदींच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून हेमांगीने त्यांच्यासाठी एक गोष्ट लिहिली आहे. त्यात ती म्हणते की, मला जर कुणी विचारलं दैवी म्हणजे काय? तर मी म्हणेन, ‘हा आवाज’ जादू म्हणजे काय तर हा आवाज. निखळ, नितळ, तरल म्हणजे काय तर हा आवाज, शाश्वत म्हणजे काय तर हा आवाज! आमचं भाग्य ज्या शतकात हा आवाज जन्माला आला त्याच शतकात, काळात आम्ही जन्माला आलो! धन्य धन्य झालो आम्ही. आपण लहान माणसं अश्या महान व्यक्तींशी काही न काही साम्य जोडत असतो. आवाजाची साम्यता जोडायला मला १० जन्म घ्यावे लागतील. तुमचं पहीलं आणि खरं नाव ‘हेमा’ आहे कळल्यावर मला किती किती धन्य वाटलं होतं काय, कसं सांगू? हेमा, लता मंगेशकर वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!