लपंडाव हा मराठी चित्रपट १९९३ साली प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला प्रदर्शीत होऊन २९ वर्षे झाली आहेत. चित्रपटात वर्षा उसगावकर, सविता प्रभुणे, वंदना गुप्ते, अशोक सराफ, विक्रम गोखले, अजिंक्य देव, सुनिल बर्वे, पल्लवी रानडे, बालकलाकार सई देवधर, बाळ कर्वे, बळी गमरे, तारा पाटकर, किशोर नांदलस्कर हे कलाकार झळकले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रावणी देवधर यांनी केले होते. तर छायालेखन देबु देवधर यांनी निभावले होते. चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि राज्य चित्रपट महोत्सवात विशेष अभिनेत्री म्हणून पल्लवी रानडे आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून सई देवधर हिला पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
बालकलाकार सई देवधर हिने असीमच्या बहिणीची म्हणजेच चिनुची भूमिका बजावली होती. चित्रपटातली ही बालकलाकार आज प्रसिद्ध अभिनेत्री तसेच दिग्दर्शिका म्हणून नावारूपाला आलेली आहे. लपंडाव चित्रपटाच्या दिग्दर्शिका श्रावणी देवधर ह्या सईची आई तर वडील देबू देवधर हे सिनेमॅटोग्राफर, लेखक म्हणून ओळखले जातात. श्रावणी देवधर यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. बालकलाकार म्हणून नाव कमावलेल्या सईने पुढे सारा आकाश, बात हमारी पक्की है, उडाण, द शोले गर्ल, एक लडकी अनजानी सी अशा हिंदी मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. सारा आकाश ह्या हिंदी मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती याच मालिकेत अभिनेता शक्ती आनंद देखील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाला. मालिकेत एकत्रित काम करत असताना दोघांच्या मैत्रीचे सूर जुळून आले.
२००५ साली या दोघांनी मोठ्या थाटात लग्नही केले. लग्नानंतर सई हिंदी मालिका सृष्टीत जास्त रुळलेली दिसली. बऱ्याच दिवसाच्या प्रतिक्षेनंतर तिने मोगरा फुलला ह्या मराठी चित्रपटात स्वप्नील जोशी सोबत प्रमुख भूमिका साकारली होती. अभिनयासोबतच सायलेंट टाय, ब्लड रिलेशन, बधाई हो, संस्कारी अशा चित्रपट, शॉर्टफिल्मच्या दिग्दर्शनाची धुरा तिने सांभाळली होती. साटं लोटं पण सगळं खोटं, संस्कारी आणि कलर्स मराठी वाहिनीची सोन्याची पावलं या मालिकेची निर्मिती तिने केली. याच मालिकेतून तिने देवी आईची भूमिका साकारून मराठी मालिका सृष्टीत पाऊल टाकले. अभिनेता शक्ती आनंद आणि सई देवधर ह्यांना एक मुलगी देखील आहे, तीचं नाव नक्षत्रा आनंद. नक्षत्राला देखील अभिनयाची आवड असून आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकत शॉर्टफिल्ममधून तिने अभिनय साकारला आहे.