झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या मालिकेचे तीन पर्व प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. आजही या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात राहीले आहेत. मालिकेच्या तिसऱ्या पर्वात अभिनेत्री कृतिका तुळसकर हिने शेवंताची भूमिका साकारली होती. त्याअगोदर दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने ही भूमिका गाजवली होती. मात्र मालिकेच्या सेटवर सहकलाकारांकडून मिळत असलेली अपमानास्पद वागणूक पाहून अपूर्वाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. अपूर्वाने मालिका सोडल्यानंतर शेवंताची भूमिका कृतिकाने निभावली होती.
कृतिकाला सुरुवातीला या भूमिकेत स्वीकारणे प्रेक्षकांना थोडेसे जड गेले. मात्र त्यानंतर तिलाही या भूमिकेबद्दल चांगल्या प्रतिक्रिया मिळू लागल्या. नुकतेच कृतिकाने तिच्या दिसण्यावरून एक अनुभव शेअर केला आहे. आपण चांगले दिसत नाही यावरून तुम्हाला रिजेक्ट केलं गेलं हे बोलायलाही धाडस लागतं. हे धाडस कृतिकाने आज केलेलं पाहायला मिळालं. तू जाड आहेस, तू बुटकी आहेस, तू काळी आहेस असं तुम्हाला कोणी म्हटलंय का? मला म्हटलंय. बऱ्याच वर्षांपूर्वी तू सुंदर दिसत नाही असं सांगून मला एका शोसाठी रिजेक्ट केलं होतं. पण त्यानंतर मी रात्रीस खेळ चाले मालिकेच्या सेटवर माझ्या चाहत्यांना भेटत होते. तेव्हा ते येऊन मला सांगत होते की, तुम्ही किती सुंदर दिसता. सोशल मीडियावर सुद्धा बरेच प्रेक्षक माझे चाहते मला सुंदर दिसता म्हणून सांगत होते.
मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही कसेही दिसत असला, तुमची शारीरिक ठेव कशीही असली तरी प्रत्येकजण हा सुंदर दिसतच असतो. कोणी काहीही म्हटलं तरी आपण निराश होऊन रडत बसण्यापेक्षा आपले सौंदर्य कसे वाढवू याकडे लक्ष दिले पाहिजे. कृतिका तिच्या अशा व्हिडिओतून चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. काही दिवसांपूर्वी कृतिकाने स्वतःच्या हक्काचं घर खरेदी केलं होतं. त्यावेळी तिने तिच्या मांजराच्या पायाचे ठसे दारावर उमटवले होते. तेंव्हा कृतिका चर्चेत आली होती. दिग्दर्शक विशाल देवरुखकर सोबत कृतिका विवाहबंधनात अडकली आहे. दोघांचा नव्या घरात छान संसार सुरू आहे. कृतिकाने रंगभूमीवरून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. विजेता, बबन, बेनवाड, बाय गो बाय, पाशबंध अशा चित्रपटातून कृतिकाने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.