क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांचे लव्ह मॅरेज आहे. या दोघांनी एकत्रित आजवर कोणत्याही चॅनलला मुलाखत दिली नव्हती. मात्र अमृता राव आणि आर जे अनमोल यांच्या युट्युब चॅनलला या दोघांची पहिली वहिली मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत क्रांती आणि समीर वानखेडे यांनी आपल्या लव्हस्टोरीचा खुलासा केला आहे. रुईया कॉलेजमध्ये या दोघांची पहिली भेट झाली होती. इतिहास विषयाची आवड असल्याने दहावी नंतर समीर वानखेडे यांनी रुईया कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले होते, त्याच कॉलेजमध्ये क्रांतीनेही ऍडमिशन घेतले.
समीर वानखेडे शरीराने धष्टपुष्ट होते ते पाहून पहिल्याच भेटीत क्रांतीने त्यांची खिल्ली उडवली होती. तर ही कोण नॉनसेन्स मुलगी आहे म्हणत समीर वानखेडे यांनी क्रांतिकडे कानाडोळा केला होता. क्रांती रेडकर मस्तीखोर तर समीर वानखेडे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. समीर नेहमी पहिल्या बेंचवर तर क्रांती रेडकर शेवटच्या बेंचवर बसायची. समीर वानखेडे यांना छळण्यासाठी क्रांती त्यांच्या मागे बसू लागली. त्याचदरम्यान क्रांती रेडकर तू तू मी मी नाटकासाठी कॉलेजला दांड्या मारू लागली. अशा मुली का जन्माला येतात असे मत त्यांनी क्रांतीच्या बाबत बनवले होते. तेव्हा नाटकामुळे दोन वर्षे समीर यांनी क्रांती पासून सुटका मिळवली होती. पदवीचे शिक्षण झाल्यानंतर समीर यांनी वकिलीचा अभ्यास केला, त्यानंतर सिव्हिल सर्व्हिससाठी तयारी केली.
यादरम्यान क्रांतीनेही जत्रा चित्रपटासह तब्बल १४ चित्रपटातून काम केले. दोघेही आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले. २००१ साली कॉलेज संपलं त्यानंतर या दोघांची भेट झाली ती २०१० साली. पण मधल्या काळात म्हणजे २००६ सालच्या दरम्यान टीव्हीवर क्रांतीला पाहिलं तेव्हा ही नॉनसेन्स मुलगी इथे काय करते? असा प्रश्न समीरजींना पडला. त्यानंतर २०१० साली मुंबईच्या सहाय्यक पोलीस पदासाठी समिरजींची नेमणूक झाली. त्याचदरम्यान क्रांती रेडकर मिफ्टाचा अवॉर्ड शो करून दुबईहून मुंबईच्या एअरपोर्टवर रात्री दीड वाजता आली. त्यादिवशी क्रांती खूप घाबरलेली होती कारण तिच्या बॅगमध्ये मित्रांनी दिलेल्या दारूच्या दोन बाटल्या होत्या. अर्थात यासाठी तिच्याकडे परवाना होता, मात्र तरीही ती घाबरलेली होती.
क्रांतीच्या घरी कोणीच मद्यपान करत नसे पण मित्र म्हणाले म्हणून तिने बाटल्या तिच्या बॅगमध्ये ठेवल्या होत्या. त्याचवेळी समीर वानखेडे यांनी क्रांतीला बोलावले. तू मला ओळखलं का? असा प्रश्न विचारल्यावर क्रांती थोडी गोंधळली. पण जेव्हा समिरजींनी एक स्माईल दिली त्यांच्या गालावरच्या खळीवरून तिने त्यांना ओळखलं. कारण या खळीवरूनच समिरजींना तिने कॉलेजमध्ये असताना चिडवलं होतं. त्यानंतर दोघांची पुन्हा नव्याने ओळख झाली तेव्हा क्रांतीने फोन नंबर मागितला. काही दिवसांनी क्रांतीने समीरला डेटवर बोलावले. समीरचे लग्न झालेले आहे की नाही हेही तिला माहीत नव्हते. त्यावेळी बोलण्यातून समजले की समीर पहिल्या पत्नीसोबत घटस्फोटाच्या प्रोसेसमध्ये होता. त्यावेळी समीरला खरी आधाराची गरज होती.
पण त्यानंतर घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समिरनेच क्रांतीला लग्नाबाबत विचारले. २०१७ साली या दोघांनी रुईया कॉलेज जवळच्या मंदिरात सनातनी पद्धतीने, मराठमोळ्या पद्धतीने आणि नोंदणी पद्धतीने अशी तीन वेळा लग्नगाठ बांधली. या मुलाखतीत समीर वानखेडे पहिल्यांदाच क्रांतीबद्दल भरभरून बोलले. क्रांतीचा आजही कधी मला फोन आला तर तिच्याशी बोलताना २०१० साली जेवढी उत्सुकता होती तीच आजही आहे असे ते म्हणतात. पुनर्जन्म असं काही असेल तर त्या जन्मात मला तिच्यासोबत आयुष्य घालवायला नक्की आवडेल.