शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास गोरेगाव फिल्मसिटी येथे भीषण आग लागली होती. या आगीत गुम है किसी के प्यार में हिंदी मालिकेचा सेट पूर्णपणे जाळून खाक झाला होता. मालिकेत जे चव्हाण निवास दाखवण्यात येत होते त्याच सेटला ही आग लागली. सेटवर उपस्थित असलेल्या कलाकारांना, बॅक आर्टिस्टला तात्काळ बाहेर काढण्यात यश मिळाले. त्यामुळे घडलेल्या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे समोर आले. दरम्यान ही आग एका सिलेंडरच्या स्फोटामुळे लागली असल्याचे कारण नुकतेच समोर आले आहे. सेटवर आग लागल्याचे पाहून मालिकेच्या सेटवर एकच गोंधळ उडाला होता. यातील कलाकार मंडळींना काय करावे हेच सुचत नव्हते.
किशोरी शहाणे, आयेशा सिंग, नील भट हे कलाकार तर आग लागलेली पाहून खूप घाबरून गेले. मालिकेचा सेट आपल्या डोळ्यांदेखत जळतोय ही भावना त्यांना आतून सतावत होती. आयेशा सिंगला तर समोरचे चित्र पाहून रडूच कोसळले होते. सेटला आग लागल्याचे कळताच चाहत्यांनी त्यांच्याबाबत काळजी व्यक्त केली. अनेकांचे मेसेजेस फोन कॉल त्यांना येऊ लागले. मात्र या घटनेतून आम्ही सुखरूप बाहेर पडलो आहोत असे आश्वासन त्यांनी दिले. सेटवर लागलेली आग ही एवढी भयानक होती की आगीचे लोटच्या लोट उसळू लागले होते. जवळच ये तेरी मेरी डोरीयां मालिकेचा सेट होता. आगीची काही झळ या मालिकेपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. एका तासात ही आग आटोक्यात आली, पण तोपर्यंत सेट पूर्णपणे जाळून खाक झाला होता.
किशोरी शहाणे यांनी या दुःखातून सावरण्याचे आम्हाला बळ मिळो अशी प्रार्थना केली आहे. सेट पूर्णपणे जळून खाक झाला असला तरी आमची संपूर्ण टीम पुन्हा त्याच जोमाने कामाला लागली आहे. दरम्यान प्रेक्षकांचे मनोरंजन थांबणार नाही असेही त्यांनी आश्वासन दिले आहे. मात्र दुसरीकडे मालिकेच्या आयोजकां विरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले जात आहेत. एवढा मोठा सेट असताना आणि दररोज हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती असते. आग आटोक्यात आणण्यासाठी आयोजकांकडे कुठलीच उपाययोजना कशी नाही? असा प्रश्न ऑल इंडिया सिने वर्क्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी उपस्थित केला आहे. निर्माते, चॅनल आणि प्रोडक्शन हाऊस यासोबतच फिल्मसिटीच्या मॅनेजिंग डायरेक्टर विरोधात तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.