मराठी कलाविश्वात चांगले वाईट अनुभव घेणारे अनेक कलाकार आहेत. स्ट्रगल काळात बहुतेक कलाकारांनी अभिनय क्षेत्रात येण्यासाठी खस्ता खाल्लेल्या असतात. पण काहींना मात्र हा मार्ग सहजसोपा झालेला आहे. अगदी श्रुती मराठेला देखील सुरुवातीच्या काळात या इंडस्ट्रीत येण्यासाठी वाईट अनुभव आला आहे. तुम्ही नवीन आहात त्यामुळे काम मिळवण्यासाठी तुम्ही अव्हेलेबल आहात अशी एक विचारसरणी पुढे येत असते. मराठीपेक्षा हिंदी इंडस्ट्रीत या गोष्टी सर्रास पहायला मिळतात. पण मग कलाकारांनीच जर या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर ते स्वतःला अशा गोष्टीपासून वाचवू शकतात.

अभिनेत्री काजल पाटील हिनेही स्ट्रगलच्या काळात असाच काहीसा अनुभव घेतलेला आहे. काजल पाटील ही स्टार प्रवाहवरील शुभविवाह या मालिकेत काम करत आहे. काही दिवसांपूर्वी किशोरी अंबीए यांच्या सोबतचा एक खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. हॅश टॅग लाईक मदर लाईक डॉटर म्हणत काजलने आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्या पाठिंब्यामुळेच. असे म्हणत किशोरी अंबीए यांचे आभार मानले होते. पण या फोटोवर त्यांना तुम्ही खऱ्या आयुष्यात मायलेकी आहात का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले. तेव्हा किशोरी अंबीए यांनीच हो म्हणत या गोष्टीचा खुलासा केलेला पाहायला मिळाला. पण खरं तर किशोरी अंबीए आणि काजल पाटील या दोघींनी कुलस्वामिनी या मालिकेतून एकत्रित काम केले होते.

माय लेकीच्या भूमिकेत या दोघी एकत्रित झळकल्या होत्या, त्यामुळे दोघींमध्ये एक छान बॉंडिंग जुळून आलेले होते. तेव्हापासून आई आणि लेक असेच त्यांच्यात नाते तयार झालेले आहे. काजल पाटील ही कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकातून काम करत असे. कुलस्वामिनी मालिकेत काजलच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळाला होता. तुझ्यात जीव रंगला, काय घडलं त्या रात्री, शुभ विवाह अशा मालिकेतून काजलने आतापर्यंत अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या प्रवासात काजलला एक धक्कादायक अनुभव आला. याबद्दल ती म्हणते की, एक दिग्दर्शक मला रात्रीचा फोन करायचा. मी त्याच्यासोबत काम केलं नव्हतं. पण या इंडस्ट्रीत आल्यानंतर मी ठरवलं होतं की रात्री ९, १० नंतर कोणाचेही फोन उचलायचे नाही. कितीही कामाचा फोन असला तरीही मी फोन उचलत नाही, कारण नाहीतर ते आपल्याला गृहीत धरतात. काम असेल तर तुम्ही सकाळी फोन करा. पण मग त्यांनाही ते समजलं असेल की आपलं काही काम होणार नाही. मग तेच एक पाऊल मागे जात असतील. असे काजलने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.