नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नाळ २ चित्रपटात जितेंद्र जोशी एक महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. नाळ या चित्रपटात चैत्याची फक्त आईच दाखवण्यात आली होती. तिला कुठलेच संवाद देखील नव्हते मात्र नाळ २ या चित्रपटात चैत्याची खरी आई आणि वडिलांच्या भावविश्वाचा उलगडा होताना दिसत आहे. अर्थात नागराज मंजुळे यांनीच ही भूमिका साकारण्याची संधी जितेंद्रला देऊ केली होती. मित्राच्या इच्छेखातर जितेंद्रने देखील हा चित्रपट लगेचच स्वीकारला. नागराजचा चित्रपट म्हणजे तो उत्तम असणारच याची जितेंद्रला खात्री होती.
चित्रपटाच्या निमित्ताने जितेंद्र जोशीने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत. याच एका मुलाखतीत मी जन्माने मारवाडी आहे असा उल्लेख करतो. जितेंद्र जोशी म्हणतो की, मी जन्माने मारवाडी जरी असलो तरी मी अमराठी नाही, मी मराठीच आहे. राजस्थानमध्ये जन्माला आलेला मुसलमान हा मारवाडी असतो तसाच महाराष्ट्रात जन्माला आलेला मारवाडी हा मराठीच आहे. जोशी आडनाव असल्याने कित्येकदा जितेंद्रला मराठीच असल्याचे म्हटले गेले होते. पण तो मारवाडी आहे याचा खुलासा त्यानेच अगोदर केलेला होता. पुण्यात लहानाचा मोठा झालेला जितेंद्र कला क्षेत्रात दाखल झाला. त्याचे कवितेबद्दलचे वेड तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. कलाकार म्हणून तो एका विशिष्ट धाटणीच्या चित्रपटांची निवड करत असतो.
पण एका ठराविक वयोमानानुसार कलाकाराने कुठेतरी थांबायला हवं असं त्याचं स्पष्ट मत आहे. मला दागिने नको, फार्महाऊस, मर्सिडीज असं काहीच नको. आईला सांभाळावे आणि मुलीचे शिक्षण होण्याइतपत कमवावे अशी त्याची अपेक्षा आहे. त्यानंतर भारतभ्रमंती करावी आणि आपला वेळ योग्य मार्गी लावावा असे त्याचे मत आहे. एक उदाहरण देताना तो म्हणतो की विक्रम गोखले यांनी सुद्धा एकेकाळी रंगभूमीवर काम करणार नसल्याचे जाहीर केले होते. एका ठराविक कालावधीनंतर आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाही याची जाणीव झाली की काम बंद करावं. आणि उरलेला काळात फिरण्याचे छंद जोपासावेत असे तो म्हणतो.