खुपते तिथे गुप्ते या शोमध्ये आजवर नामवंत राजकारण्यांनी तसेच कलाकारांनी हजेरी लावलेली आहे. येत्या रविवारच्या भागात अभिनेता, कवी जितेंद्र जोशीला आमंत्रित करण्यात आलं आहे. जितेंद्र जोशीने त्याच्या आयुष्यातले अनेक मजेदार किस्से आणि काही आठवणी इथे शेअर केलेल्या पाहायला मिळाल्या. मुंबईच्या रस्त्यावर एका वाट चूकलेल्या मावशीची मदत केली हे सांगताना जितेंद्र भावुक झाला. मोतीबिंदू झालेल्या आणि स्मृती गेलेल्या मावशीला रस्त्यावर चार पाच दिवस असं उपाशी फिरताना पाहून जितेंद्रला त्यांची दया आली.
मावशीला त्याने घरी नेलं, जेवू घातलं. सकाळी उठून त्याच्या आईने त्यांना साडी नेसायला दिली. उंबराती असं त्या मावशीने त्यांच्या गावाचं नाव सांगितलं. तेव्हा एका गाडीत त्याने त्यांना बसवून दिलं. हे सांगताना जितेंद्र एका पॉइंटला खूप भावनिक झाला. अर्थात त्याने त्या मावशींना कुठे नेलं हे जाणून घेण्यासाठी रविवारचा भाग प्रेक्षकांना पाहावा लागणार आहे. जितेंद्र जोशी गुलजार यांच्या बंगल्यासमोर असलेल्या गुलमोहरच्या झाडाला तासनतास कवटाळून बसायचा. किशोर कदमला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने जितेंद्रची गुलजार यांच्यासोबत भेट घडवून आणली. गुलजार यांना भेटल्यानंतर त्यांनी जितेंद्रला काय करतोस विचारले. तो म्हणाला मी ऍक्टर आहे. तुम्हाला भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले. काय सांगायचंय तुला?
गुलजार यांनी विचारले तेव्हा तुमच्या घराच्या बाहेर जे गुलमोहरचे झाड आहे. त्याच्यासोबत तुमची मैत्री असेल तर त्याला विचारा, मी त्याला सगळं काही सांगितलंय, असे जितेंद्र म्हणाला. यावेळी संजय मोने एका व्हिडीओमध्ये जितेंद्रवर नाराज असल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच संजय मोने यांचा वाढदिवस झाला होता, जितेंद्रच्या हे खूप उशिरा लक्षात आले. मात्र त्यानंतर त्याने फोन करून शुभेच्छा दिल्या. यामुळे संजय मोने जितेंद्रवर नाराज होते, पण काका कधीही माझ्यावर नाराज होऊ शकत नाही असे जितेंद्र म्हणतो. माझा बाप आहे तो, माझ्या अपघातानंतर त्याने मला उभं केलंय रे. मला परत एकदा मी हिरो आहे तशी जाणीव मला त्या माणसाने करून दिली. असे म्हणताच संजय मोने मागून आले, हे पाहून जितेंद्रने त्यांना मिठीच मारली.