सोनी मराठी वाहिनीवरील गाथा नवनाथांची या अध्यात्मिक मालिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नुकताच या मालिकेने ५०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केला. गाथा नवनाथांची या मालिकेतून नावनाथांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेण्यात आला. यात मच्छिंद्रनाथांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या आयुष्यात चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. ही भूमिका जयेश शेवलकर याने साकारलेली आहे. जयेशला काल शुक्रवारी ६ जानेवारी रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली. ही बातमी त्याने सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांना कळवली आहे. जयेशने ही बातमी शेअर करताच सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.
अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना जयेशने या क्षेत्रात उतरण्याचे धाडस दाखवले. सहाय्यक भूमिका साकारत असताना पुढे जाऊन आपल्याला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळेल याचा विचारही त्याने कधी केला नव्हता. बुलढाण्यातील खामगाव येथील छोट्याशा गावात जयेश लहानाचा मोठा झाला. शालेय शिक्षणासोबतच त्याने सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग घेतला. पुढे सिव्हिल इंजिनिअरिंग करण्यासाठी त्याने पुणे गाठले. नाटकाची आवड असल्याने त्याने या क्षेत्रात उतरण्याचे ठरवले. त्यासाठी ललीतकला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले. नाटकातून रंगभूमीवरचा प्रवास सुरु असतानाच त्याला लक्ष्य मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेनंतर पुढे पसंत आहे मुलगी, स्वराज्यरक्षक संभाजी, बाळूमामाच्या नावानं चांगभलं अशा मालिकांमधून सहाय्यक भूमिका साकारल्या.
गाथा नावनाथांची ही त्याची प्रमुख भूमिका असलेली पहिलीच मालिका. यात तो मच्छिंद्र नाथांची भूमिका साकारत आहे. इथे ओशाळला मृत्यू या नाटिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जयेशने साकारली होती. अभिनया सोबतच जयेशने काही शॉर्टफिल्म आणि पटकथा लेखनाची कामं केलेली आहेत. गाथा नवनाथांची मालिकेत जयेशने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. जयेशची पत्नी भावना हर्णे शेवलकर हिने नुकताच गोंडस बाळाला जन्म दिला आहे. यशाच्या या प्रवासात आता त्याला पुत्ररत्न प्राप्ती झाल्याने त्याचा हा आनंद द्विगुणित झालेला आहे. मुलाचे स्वागत करत त्याने आपल्या मुलाला एक चांगला माणूस म्हणून घडवण्याचे वचन दिले आहे. सोबतच त्याचे आयुष्य सुंदर आणि शांततापूर्ण समृद्ध कसे होईल याकडे त्याचे लक्ष्य असणार आहे.