काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत एक चुणचुणीत मुलगा चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा हे गाणं गाताना दिसला. शाळेत सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उभा राहून या मुलाने चंद्रा हे गाणं अगदी सुरात गायलेलं पाहायला मिळालं. स्वतः अमृता खानविलकर हिने देखील या चिमुरड्याच्या गाण्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. अवघ्या दोन दिवसातच त्याचा हा व्हिडीओ तुफान लोकप्रियता मिळवताना दिसला. त्यामुळे हा मुलगा कोण? याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांमध्ये निर्माण झाली. या चुणचुणीत मुलाचे नाव आहे जयेश खरे. जयेश खरे हा नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात राहतो.
जयेश सध्या सहावी इयत्तेत शिकत आहे. जयेशचा गाणं गातानाचा व्हिडीओ त्याच्या वर्गशिक्षक कृष्णा राठोड यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. अल्पावधीतच या व्हिडिओला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि जयेशच्या गाण्याचं अनेकांनी कौतुक केलं. हा व्हिडीओ इतका व्हायरल होईल याची कल्पना देखील कोणी केली नव्हती. जयेश एका सर्वसामान्य कुटुंबात वाढलेला मुलगा. त्याचे वडील विश्वास खरे हे ऑर्केस्ट्रा मध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवण्याचे आणि गायनाचे काम करतात. परंतु वर्षभर लग्नसराई नसते त्यावेळी ते शेतात मजुरीचे काम करतात. यातूनच त्यांना जे पैसे मिळतात त्यातून त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालतो. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे जयेशच्या वडिलांना नावाजलेले गायक होता आलं नाही.
मात्र आपण पाहिलेलं स्वप्न ते त्यांच्या मूलाकडून पूर्ण करून घेताना दिसत आहेत. आपल्या मुलाने गाणं शिकावं भविष्यात खूप मोठा गायक बनावं अशी त्यांची मनापासून ईच्छा आहे. जयेशला शास्त्रीय संगीत शिकता यावं यासाठी ते मेहनत घेण्यासही तयार आहेत. मात्र ग्रामीण भागात राहत असल्याने या सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत. वडिलांकडूनच तो सध्या गाण्याचे धडे गिरवत असल्याने त्याच्या गायकीमधून गाण्यामधले सूर ताल त्याला गवसलेले पाहायला मिळतात. त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मधूनच भविष्यात तो मोठा गायक बनू शकेल असा विश्वास तमाम प्रेक्षकांना वाटतो आहे. जयेशला गाण्यातील योग्य ते प्रशिक्षण मिळो अशी आशा व्यक्त केली जात आहे. आणि पुढे जाऊन त्याने या क्षेत्रात मोठं नाव कमवावं हीच सर्वांची सदिच्छा आहे.