मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेल्या सोज्वळ नायिका म्हणून जयश्री गडकर यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. २१ फेब्रुवारी १९४२ रोजी कर्नाटक मधील कारवार येथील सदाशिवगड गावात त्यांचा जन्म झाला. गडकर कुटुंब मुंबईला आल्यावर इथेच त्यांनी शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून नृत्याची आवड असणाऱ्या जयश्री गडकर यांनी कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. एकदा असेच एका कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना राम देवताळे यांनी नृत्य करतानाचा फोटो काढला आणि हा फोटो आपल्या स्टुडिओत लावला. स्टुडिओत आलेल्या दिनकर पाटील यांची नजर फोटोवर पडली आणि जयश्री यांना १९५६ सालच्या दिसतं तसं नसतं चित्रपटात काम करण्याची संधी दिली.
चित्रपटात जयश्री बाईंना फक्त नृत्य सादर करायचे होते. पुढे राजा परांजपे यांनी आपल्या चित्रपटातून अभिनयाची संधी मिळवून दिली. सांगत्ये ऐका, एक गाव बारा भानगडी, मोहित्यांची मंजुळा, साधी माणसं, सवाल माझा ऐका, अवघाची संसार, बाप माझा ब्रह्मचारी. वैशाखवणवा अशा अनेक चित्रपटातून त्यांनी आपल्या सजग अभिनयाची छाप सोडली होती. तमाशाप्रधान चित्रपटात जयश्री गडकर यांच्या भूमिका तेवढ्याच चपखल बसल्या. ऐरणीच्या देवा तुला, बुगडी माझी सांडली गं, मला वसंतसेना दिसली अशी अनेक अजरामर गाणी जयश्री बाईंवर चित्रित झाली आहेत. रामायण या हिंदी मालिकेमुळे जयश्री गडकर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या. मालिकेत त्यांनी कौशल्या मातेची वात्सल्यपूर्ण भूमिका साकारली होती.
कौशल्या मातेच्या अभिनयाने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. सलग तीन वर्षे त्यांनी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला होता. अभिनयासोबतच जयश्री गडकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शनसुद्धा केले होते. चित्रपट अभिनेते बाळ धुरी यांच्याशी त्यांनी विवाह केला. बाळ धुरी आणि जयश्री गडकर यांनी एकत्रित रामायण मालिकेत तसेच अनेक मराठी चित्रपटात एकत्रित काम केले. अविनाश आणि विश्वजित ही त्यांची दोन अपत्ये. २८ ऑगस्ट २००८ रोजी जयश्री गडकर यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने अवघ्या सिनेसृष्टीने हळहळ व्यक्त केली होती. त्यांच्या दोन्ही मुलांनी जयश्रीजींचा जीवनप्रवास उलगडण्यासाठी त्यांच्या नावाने कार्यक्रम केले, यास प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता.