नागराज मंजुळे यांनी विविध धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले त्यातीलच एक म्हणजे २०१३ सालचा फँड्री चित्रपट. चित्रपटाची जब्या आणि शालुची आगळीवेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूपच भावली. जब्या आणि शालू इतकीच या चित्रपटात प्रसिद्धी मिळाली ती काळ्या चिमणीला. आजही ही जोडी कधी एकत्र पहिली तर चित्रपटातला हा डायलॉग शालू साठी म्हणजेच नायिका राजेश्वरी खरात हिच्यासाठी वापरला जातो. जब्या आणि शालुची ही सुपरहिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात एका आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत.
प्रोजेक्टचं नाव अजून तरी गुलदस्त्यात ठेवलं असलं तरी त्याच्या चित्रीकरणाची जोरदार सुरुवात झाली आहे. एप्रिल महिन्यातच राजेश्वरी आणि सोमनाथ यांनी आपल्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली होती. हा प्रोजेक्ट जवळपास तयार झाला असून सैराट फेम अरबाज शेख देखील या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. सोमनाथ हा मूळचा सोलापूरचा, वडील लक्ष्मण अवघडे हे पोतराज म्हणून काम करायचे; हलगी वाजवत असत. नागराज मंजुळे यांनी अभिनय क्षेत्रात सोमनाथला संधी मिळवून दिली. २०११ साली नागराज मंजुळे याना पिस्तुल्या या लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानिमित्ताने त्यांचा केम गावात सत्कार होता, त्यावेळी हलगी वाजवणारा सोमनाथ त्यांना दिसला. फँड्रीचा नायक म्हणून त्यांनी सोमनाथची निवड केली होती.
चित्रपटाच्या यशानंतर फ्री हिट दणका आणि झुंड चित्रपटातून त्याने पुनरागमन केले. तर राजेश्वरी खरात हिने आयटमगिरी या चित्रपटात काम केले होते. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना तिला नागराज मंजुळे यांनी आपल्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी दिली. तू माझी राधा या अल्बम मधून राजेश्वरी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. राजेश्वरी नेहमी स्टायलिश फोटो शेअर करत असते; त्यावर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया साऱ्यांचे लक्ष्य वेधून घेतात. राजेश्वरी खरात आणि सोमनाथची जोडी चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा येणार असल्याने त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या चित्रपटाच्या ऑफरमुळे सोमनाथला काळी चिमणी घावली लका अशी भन्नाट प्रतिक्रिया मिळाली आहे.