मराठी मालिका अभिनेत्री ईशा केसकर ही अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे. या दोघांची पहिली भेट झाली ती चला हवा येऊ द्याच्या मंचावर. ईशाने यादरम्यान झी मराठीच्या दोन मालिका केल्या. जय मल्हार आणि माझ्या नवऱ्याची बायको या दोन्ही मालिकेतून ती नायकाच्या दुसऱ्या प्रेयसीची भूमिका साकारताना दिसली. तर ऋषी सक्सेना हा काहे दिया परदेस या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. चला हवा येऊ द्या मध्ये या दोघांची भेट झाल्यानंतर हे दोघेही अनेकदा एकत्र आले. पण ती केवळ एक मैत्री म्हणून. याचदरम्यान ईशाला ऋषी आवडू लागला.
तिने त्याच्याजवळ आपल्या प्रेमाची कबुलीही दिली. मात्र ऋषीने ईशाचा हा प्रस्ताव नाकारला. कालांतराने ऋषीला ईशा आवडू लागली. एक दिवस ईशाने ऋषीसोबतचा एक खास फोटो शेअर केला तेव्हापासून हे दोघे प्रेमात असल्याचे जाहीर केले गेले. ऋषी हा अमराठी असूनही मराठी चित्रपट, मालिकेतून छान रुळला. ऋषी सक्सेना आणि ईशा दोघेही सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतायेत. त्यामुळे हे दोघेही लग्न कधी करणार याबाबत त्यांना सतत विचारले जात होते. ईशा केसकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून तिच्या लग्नाबद्दल एक खुलासा केलेला आहे. ईशा म्हणते की मी चित्रपट मालिकेतून आतापर्यंत १३ लग्न केली आहेत. ही सगळी लग्न खूप थाटामाटात पार पडली आहेत. त्यामुळे मी ऋषीसोबत जे रिअल लाईफमध्ये लग्न करणार आहे ते अतिशय साधेपणाने करणार आहे.
लग्नाचा धामधूम मोठा नसणार असेही तिने या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. आता सध्या आम्ही आमच्या करिअरवर जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. पण जेव्हा कधी लग्न करणार तेव्हा ते निश्चितच साधेपणाने असेल असे तिने म्हटले आहे. ईशाने या मुलाखतीत तिने साकारलेल्या शनयाच्या भूमिकेबद्दलचा किस्सा सांगितला. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत ईशाने काही काळासाठी शनयाचे पात्र साकारले होते. ईशा भाजी खरेदी करत असताना एका काकूने तिला मागून असं खेचलं आणि फटका मारला. इशाला काही कळायच्या आतच त्या काकू तिला म्हणाल्या, त्या राधिकाला किती त्रास देशील? राधिकाच्या आयुष्यात का असं विष कालवतीये? तुला दुसरी कामं नाहीत का? काकूंच्या त्या प्रश्नांवर ईशाला काय बोलावं हेच नेमकं सुचत नव्हतं. एकंदरीतच लोक मालिकेला खऱ्या आयुष्याचा भाग समजतात. ही मला त्या भूमिकेसाठी मिळालेली पावती होती असे ती म्हणते.