२८ जुलै रोजी करण जोहर दिग्दर्शित रॉकी और राणी की प्रेम कहाणी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची बहुतेक गाणी अगोदरच हिट झाली होती. रणवीर सिंग आणि आलिया भट्टची फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रथमच प्रेक्षकांच्या समोर आली. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या कथानकाचंही विशेष कौतुक झालं. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात क्षिती जोग हिनेही महत्वाची भूमिका साकारली आहे. तिच्या कौतुकात पती हेमंत ढोमेने एक खास पोस्ट लिहिली आहे.
क्षितीचे विशेष कौतुक करताना हेमंत म्हणतो की, पाटलीणबाई, आज तुझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस! करण सरांच्या ॲाफिस मधून फोन आल्याचं तू मला सांगितलंस. घाई घाईत लुक टेस्ट आणि त्यांच्याबरोबरची तुझी मिटींग आणि तारखा आणि बाकी सगळं ठरलं बघता बघता सिनेमाचं शूट झालं. हा सगळा प्रवास मी जवळून पाहिला. प्रिमियर शो ला तुझ्या सोबत आलो. He is my husband! अशी तू सगळ्यांना ओळख करून देत होतीस. काय भारी फिलींग होतं ते! त्या शो नंतर कोण कोण येऊन तुझं कौतुक करत होते. काय कमाल वाटत होतं! आज आपण आपल्या मित्रांसोबत सिनेमा पाहिला. तुझं काम आज पुन्हा एकदा बारकाईने बघत होतो! तुझी आजवरची मेहनत, स्वतःच्या जिवावर सारंकाही करण्याची जिद्द हळू हळू फळाला येतेय.
सिनेमा संपल्यावर गर्दीतून लोक तुला भेटायला आले आणि त्या साऱ्यांनी तुझ्या साठी टाळ्या वाजवल्या. त्या टाळ्या कधी संपुच नयेत असं वाटत राहिलं. तुझं कौतुक कधीच थांबु नये असं वाटत राहिलं. हे सारं मी साठवून ठेवलंय कायमचं आणि आज तुला आवडत नसताना ही पोस्ट लिहीतोय. इतक्या भव्य दिव्य सिनेमात, एवढ्या मोठ्या नटांमधे, त्या सगळ्या झगमाटात तू लख्खं चमकत होतीस, तुझ्या कामाने! कमाल! क्षिती मला तू कायमंच आनंद दिलायस पण रॉकी और राणी की प्रेम कहाणी या चित्रपटाबद्दल Thank you! आपणंच हे सारं केलंय, हे सग्गळं आपलंच यश आहे असं खुळ्यागत वाटणारा तुझा या जगातला सगळ्यात मोठा चाहता, हेमंत. खूप खूप मोठी हो, love you!